पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भक्ती शक्ती चौक, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दापोडी या रस्त्यांचे काम १०० कोटींहून अधिक खर्च करून तयार होत आहे. वाहतूक कोंडी आणि निकृष्ट दर्जाचे काम पाहून नागरिक संतप्त झाले आहेत
अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्त्याचे कामच झाले नाही. जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले? या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, संबंधित कंत्राटदार आणि कन्सल्टंटला काळ्या यादीत टाकावे, कामावर तत्काळ स्थगिती आणावी, यासह विविध प्रश्नांवर विधिमंडळ सभागृहात मी आवाज उठवला, अशी माहिती आ. अमित गोरखे यांनी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे सदाशिव खाडे, शितल शिंदे, सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, कार्यकाळातील पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पावर अतिशय मुद्देसूद विचार मांडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान महत्त्वपूर्ण विषयांवर लक्षवेधी सादर केली. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील कथित गैरकारभाराच्या मुद्द्यावरती सभागृहाचे लक्ष
केंद्रित केले.
पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी जिल्हास्तरावर एक सदस्य समिती गठित करा अशी मागणी विधानपरिषदेमध्ये केली. माथाडी कामगारांच्या प्रश्ना संदर्भात संबंधित मंत्र्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. माथाडी कामगारांचे नेतेच कॉन्ट्रॅक्टर बनून काम करत आहेत. यावर तात्काळ आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तत्काळ करा, अशी मागणी केली, असेही ते म्हणाले.
पवना नदी प्रदूषण तसेच रिव्हर फ्रंट काँक्रिटीकरण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत रस्त्याची झालेली दुर्दशा व निकृष्ट रस्त्याचा दर्जा, तसेच एमआयडीसी संभाजीनगर व शाहूनगर भागात युडीपीसीआर धोरण लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी लावून तातडीने उद्योग राज्यमंत्री महोदयासोबत बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेण्यास उद्युक्त केले. तसेच संविधानावरील अतिशय वैचारिक यथार्थ भाषण, मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरण , तसेच परभणी येथे चिमुकलीवर झालेल्या आत्याचाराला वाचा फोडून आरोपीवर पॉस्को लावा ही मागणी तसेच राज्य परिवहन मंडळ बसेसचे इलेक्ट्रिकीकरण कधी करणार असे प्रभावी मुद्दे मांडून अधिवेशन गाजवले.
“महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनमानीपणे कारभार हाकत आहेत. धोरणात्मक निर्णयांमध्ये माजी नगरसेवकांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी वाढत आहे. याबाबत शहरातील सर्व आमदार एकत्रितपणे येवुन लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेणार आहेत”.
– अमित गोरखे, आमदार विधानपरिषद…