पिंपरी (pragatbharat.com) :- आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. दोन्ही पतसंस्थांनी माथाडी कामगारांच्या आर्थिक स्थैर्याला बळ देत उल्लेखनीय प्रगती साधली असून, सभासदांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे या सभांमधून स्पष्ट झाले.
रायरेश्वर पतसंस्थेचा ३२ वा वार्षिक अहवाल अध्यक्ष सतीश कंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सादर करण्यात आला. संस्थेचे वसूल भाग भांडवल : ₹७ कोटी ४५ लाख, ठेवी : ₹२ कोटी ५ लाख, कर्जवाटप : ₹१२ कोटी ३५ लाख, स्वनिधी निधी : ₹२ कोटी ३७ लाख, बँकेत गुंतवणूक : ₹३ कोटी २४ लाख, निव्वळ नफा : ₹१ कोटी ५ लाख आहे. सध्या संस्थेची सदस्यसंख्या १२७० असून संस्थेने मोठी आर्थिक प्रगती नोंदवली आहे. तर, मातोश्री पतसंस्थेचा २८ वा वार्षिक अहवाल अध्यक्ष पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सादर करण्यात आला. संस्थेची सद्यस्थितीतील सदस्यसंख्या १४४४ इतकी असून संस्थेचे वसूल भाग भांडवल : ₹९ कोटी ७० लाख, ठेवी : ₹२ कोटी ३४ लाख, कर्जवाटप : ₹१७ कोटी ९६ लाख, स्वनिधी निधी : ₹३ कोटी ५३ लाख, बँकेत गुंतवणूक : ₹२ कोटी ९८ लाख, निव्वळ नफा : ₹१ कोटी ३२ लाख असा आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप देशमुख अध्यक्ष असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे, संचालक मंडळ श्रीकांत मोरे (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर घनवट (सचिव), रोहित नवले (खजिनदार), तसेच संचालक भिवाजी वाटेकर, शंकर निकम, विजय खंडागळे, सुभाष पुजारी, बाळू ओव्हाळ, संदीप चोरे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते. बबन काळे उपाध्यक्ष, उद्धव सरोदे (सचिव), सर्जेराव कचरे (खजिनदार), तसेच संचालक गोरक्ष दुबाले, बाबासाहेब पोते, अशोक साळुंके, विठ्ठल इंगळे, समर्थ नाईकवडे, ज्ञानदेव पाचपुते, चंद्रकांत पिंगट तसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद कामगार वर्ग सहभागी झाला होता.
यावेळी बोलताना इरफान सय्यद म्हणाले, “मातोश्री व रायरेश्वर या दोन्ही पतसंस्थांनी कामगारांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेचा मार्ग उघडून दिला आहे. सभासदसंख्येत वाढ, ठेवीत वाढ, पारदर्शक कारभार, स्वनिधी आणि बँक गुंतवणूक या बाबी यशाचे मूळ आहेत. आमचे धोरण नेहमीच कामगारवर्गाच्या हिताचे राहील, याची मी खात्री देतो. या दोन्ही पतसंस्थांच्या यशस्वी वाटचालीसाठी संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वर्ग यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले असून, भविष्यातही संस्थेचा कारभार विश्वासार्हतेने आणि पारदर्शकतेने चालवण्याचा निर्धार यातून दिसून येत आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव कचरे यांनी तर अहवाल वाचन प्रकाश पवार आणि धर्मराज कदम यांनी केले.