About Twitter Ex Ceo Jack Dorsey His Career And Companies Who Claimed On Modi Government Detail Marathi News



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jack Dorsey : ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांच्या एका मुलाखतीच्या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. “शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टीका करणाऱ्या अकाऊंट्सना ब्लॉक करण्याचा दबाव मोदी सरकारने केला होता,” असा खळबळजनक दावा ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे, तर काँग्रसकडून या दाव्यामुळे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. 

परंतु हा दावा करणारे जॅक डोर्सी नेमके आहेत तरी कोण हा प्रश्न अनेकांना आता पडला आहे. जॅक डोर्सी हे ट्विटरचे सह-संस्थापक असून त्यांनी 2015 ते 2021 पर्यंत त्यांनी ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीवर हिंडनबर्गने देखील अनेक आरोप केले आहेत. तसेच त्यांनी ट्विटरच्या जबाबदारीनंतर देखील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

कोण आहेत जॅक डोर्सी?

अमेरिकेत 19 नोव्हेंबर 1976 रोजी जॅक डोर्सी यांचा जन्म झाला. त्यांनी 2006 मध्ये डोर्सी यांनी ईवान विल्यम्स यांच्यासोबत ट्विटर या जगप्रसिद्ध कंपनीची स्थापना केली. तसेच त्यांच्यावर 2015 ते 2021 पर्यंत ट्विटरच्या सीईओपदाची देखील जबाबदारी होती. जॅक डोर्सी यांनी राजीनाम्या दिल्यानंतर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळली. डोर्सी यांनी युजर्सना मोबाईलवरुन पेमेंट करता यावे यासाठी Block Inc ची स्थापना केली. कोरोना काळात यावरुन जवळपास 5.1 कोटींचे व्यवहार झाले असल्याचं म्हटलं जात आहे. 

एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर ट्विटरला स्पर्धा देण्यासाठी जॅक डोर्सी यांनी BlueSky हे अॅप लाँच केले. हे अॅप ट्विटरप्रमाणेच एक सोशल मीडियाचे माध्यम आहे. सुरुवातीला ब्लूस्काय हा ट्विटर कंपनी अंतर्गत एक प्रकल्प होता. मात्र ट्विटर सोडण्यापूर्वी जॅक डोर्सी यांनी ब्लूस्कायला स्वतंत्र कंपनी म्हणून स्थान दिलं. त्यानंतर त्यांच्या स्क्वेअर या अमेरिकन पेमेंट अॅप असलेल्या कंपनीने ऑस्ट्रेलियन ‘आफ्टरपे’ या जगप्रसिद्ध कंपनीचा ताबा घेतला. तब्बल 29 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या किंमतीला हा व्यवहार झाला होता. ‘स्क्वेअर’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सीने यांनीच याबद्दल घोषणा केली होती. 

हिंडेनबर्गचा अहवाल आणि डोर्सी यांच्या अडचणी

हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर जॅक डोर्सी यांच्या Block Inc या कंपनीवर निशाणा साधला. हिंडनबर्ग रिसर्च फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, “Block Inc कंपनीने युजर्सची संख्या वाढवून दाखवली तर कस्टमर झाल्यानंतर खर्च कमी दाखवला.” हिंडेनबर्गचा हा अहवाल आल्यानंतर डोर्सी यांच्या कंपनीच्या शेअर्सममध्ये देखील जवळपास 18 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यावेळी जॅक डोर्सी यांच्या कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 

याच जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारच्या विरोधात अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. तर “डोर्सी यांच्या काळात ट्विटरने भारतीय नियमांचं उल्लंघन केलं” असा आरोप केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे. त्यामुळे जॉस डोर्सी यांच्या या दाव्यांमुळे आता पुढे काय होणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘ट्विटर बंद पाडू, अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकू’; शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारची धमकी? माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा

Related posts