महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, ‘मी स्वत:..’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar On INDIA Alliance Seat Sharing: राज्यसभेचे खासदार तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे कल पाहिल्यास लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकेल असं पवार म्हणालेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचंही पवारांनी सांगितलं. उर्वरित जागांसंदर्भातील चर्चेसाठी उद्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

काही राज्यांमध्ये वाद

“अलिकडे इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. अनेक राज्यांमधील घटक पक्षांमध्ये राज्यस्तरावर चर्चा सुरु आहेत. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती मर्यादित आहे. काही राज्यांमध्ये वादविवाद आहे हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर आम्ही अजून चर्चा केलेली नाही,” असं शरद पवार म्हणाले. “शक्य त्या ठिकाणी समझोता व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वरिष्ठांची बैठक होईल,’ असंही पवारांनी सांगितलं.

काही दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटणार

राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातही शरद पवारांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी चर्चेत नसतो. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात,” असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील 3 जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झालेला नाही. उद्या याबाबत बैठक होणार आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली. “महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 39 जागांवर एकमत झालंय. तर इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल. तसंच 2 – 4 जागांवर तिढा असेल तिथे मी स्वत: इतर नेत्यांसोबत चर्चा करेन,” असं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसांत मविआतील जागावाटपाचा तिढा सुटलेला असेल असे संकेत मिळत आहेत. 

महाराष्ट्राबाहेरही लोकसभा लढवणार?

तसेच कर्नाटकमधील निपाणीमधून लढण्याचा महाविकास आघाडीचा मानस असल्याचंही शरद पवार म्हणाले. “निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय, सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे,” असं त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा >> ‘फडणवीस CM असतानाही..’; 10% मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

चव्हाण भाजपात गेल्याचं आश्चर्य वाटत नाही कारण…

“अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श बाबत एक श्वेतपत्र काढले आणि जे व्हायचं ते झालं,” असं सूचक विधानही शरद पवारांनी केलं. काँग्रेस आम्ही एकत्रच काम करतो याचा अर्थ विलीनीकरण होणार असा घेता येणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गट स्वतंत्रपणे काम करेल असं स्पष्ट केलं.

Related posts