अरुंद रस्ते, गल्लीबोळ कचरामुक्त करण्यासाठी ई ऑटो रिक्षाची संकल्पना



( प्रगत भारत । pragatbharat.com)

अरुंद रस्ते गल्लीबोळ आता कचरामुक्त होणार आहे. झोपडपट्टीत घरोघरी कचरा संकलनासाठी ‘ई ऑटो रिक्षा धावत आहेत. ‘ई ऑटो रिक्षा’च्या वापरामुळे कचरा संकलन सोपे होतानाच वाहतुकीसाठीही हा पर्याय सोयीचा ठरत आहे.

घरगुती कचरा संकलनावर भर देतानाच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीबहुल भागात स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

प्रत्येक ई-रिक्षाची किंमत 5 लाख आहे आणि ती 450 किलो कचरा गोळा करू शकते. परिसराच्या गरजांचा अभ्यास करून एम पूर्व प्रभागाने कोणत्या भागातून आणि ई-रिक्षा केव्हा कचरा उचलणार याचे वेळापत्रक तयार केले आहे. रिक्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदार जबाबदार असेल आणि चालकाला काम देईल. कचरा गोळा करण्यासाठी BMC लहान बंद वाहने, लहान-मोठे आणि मोठ्या प्रमाणात कॉम्पॅक्टर वापरते.

शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी पालिकेने ‘व्हिजन 2030’ तयार केले आहे. मुंबईला सर्वात स्वच्छ जागतिक शहर बनवण्यासाठी पुढील 10 वर्षांचा कृती आराखडा म्हणून हा मसुदा काम करेल. त्या अनुषंगाने कचरामुक्तीसाठी नागरी यंत्रणा विविध पद्धती वापरत आहे.

दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या ‘एम पूर्व’ विभागात पहिल्यांदा ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आणखी भागात अशा स्वरूपाची वाहने वापरण्यात येतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागात देखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येत आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या भागात मोठ्या जीपसारखी वाहने नेण्यासाठी तसेच वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी आकाराने छोट्या ई ऑटो रिक्षांचा वापर करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार तीन ई ऑटो रिक्षांचा वापर सध्या ‘एम पूर्व’ विभागात करण्यात येत आहे.


हेही वाचा

बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा


मुंबईकरांच्या सेवेत अडीच हजार एसी बस लवकरच दाखल होणार

Related posts