bjp pankaja munde speech in beed parali bhagwan gad targets social trolling( प्रगत भारत । pragatbharat.com)

भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीवरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील त्यांच्या या विधानानंतर आता अजून एका उपहासात्मक विधानाची चर्चा आहे. बीडच्याच एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी ‘मी सध्या बेरोजगारच आहे’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. यावेळी पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचाही समाचार घेतला.

बीडच्या परळी शहरात संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी बुधवारी संध्याकाळी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी व्यासपीठावरून भाषण करताना पंकजा मुंडेंनी सोशल मीडिया ट्रोलिंगवर भाष्य करताना हल्लीचं युद्ध वेगळं असल्याचा उल्लेख केला.

“आत्ताचं युद्ध वेगळं आहे”

“जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या (गोपीनाथ मुंडे) वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे. सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“मी राजकारणात असेन. परळीची नाही, समजा राज्यातील अनेक लोकांची नेताही असेन. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी किनाऱ्यावर बसून काम करण्यापेक्षा मैदानात उतरून किंवा समुद्राच्या वादळात उतरून आपली नौका पार लावण्याकडे माझा कल जास्त आहे. आणि तेच कायम राहणार आहे”, असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.

“हे म्हणजे एक तीर में दो निशाण”

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी भगवान गडावरील एका व्यक्तीला उद्देशून मिश्किल टिप्पणी केली. “काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. हे एक तीर में दो निशाण आहे”, अशी कोपरखळी पंकजा मुंडेंनी मारली! त्यांचं हे विधान ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला!

“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख!

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

पंकजा मु्ंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगली होती. “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर लढवू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे. पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

मात्र, या विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं होतं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलनामधील माझ्या भाषणाच्या या हायलाईट्स. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांमधून जमले तर हेही पाहा. मतितार्थ लक्षात येईल. धन्यवाद’, असं आपल्या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.Related posts