Shinde group prepares for Dussehra melava in Bandra-Kurla complex mumbai( प्रगत भारत । pragatbharat.com)

शिवसेनेतील खासदार, आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही मेळाव्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर कोणत्या मेळाव्याला अधिक गर्दी होणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दीड ते दोन लाख समर्थक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा- Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि बंडखोर आमदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे याकरिता उभयतांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. महानगरपालिकेने अर्जावर कोणताच निर्णय न घेतल्याने शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली होती. त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांनीही न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास परवानगी दिली. तत्पूर्वीच शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीएचे मैदान उपलब्ध झाले होते. आता दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा- ‘खरी शिवसेना’ वाद : “सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर…”; दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान

राज्यातील विविध शहरांतून, तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांना मेळाव्यासाठी मुंबईत आणण्याच्या हालचाली दोन्ही गटांकडून सुरू झाल्या आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीचा शिंदे गटातील पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नुकताच आढावा घेतला. मेळाव्याला दीड ते दोन लाख समर्थक येतील, असा दावा शिंदे समर्थकांकडून करण्यात येत आहे. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ४० हजार व्यक्ती सामावतील इतकी आहे. त्या तुलनेत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची क्षमता अधिक आहे. एमएमआरडीए मैदानातील मेळाव्याला मोठी गर्दी होईल, असा दावा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.Related posts