Ias Officer Harjot Kaur Bhamra Mocks Sanitary Pads And Condoms Bihar Marathi News News( प्रगत भारत । pragatbharat.com)

IAS Officer Harjot Kaur Bhamra : बिहारमधील (Bihar) पाटण्यात (Patna) ‘सशक्त बेटी, समृद्ध बिहार’ शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील एक घटना व्हायरल होत आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्याला मुलीनं सॅनिटरी पॅडबाबात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना आयएएस महिला अधिकाऱ्यानं उद्या कंडोम मोफत मागाल, असं उत्तर दिलं. यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ‘सशक्त बेटी, समृद्ध बिहार’ शिबिरात एका महिला आयएएस अधिकाऱ्यानं हे वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

बिहारची राजधानी पाटण्यात मुलींच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झाला आहे. सरकार 20-30 रुपयांना मिळाणारं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? असा सवाल एका मुलीनं आयएएस अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, या मागण्यांना अंत आहे का? असा उलट सवाल महिला आयएएस अधिकाऱ्यानं केला. तसेच, पुढे बोलताना सॅनिटरी पॅडची मागणी होते, शूज का देऊ शकत नाही? कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा कंडोमही विनामूल्य द्यावं लागेल, असं उत्तर आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी दिलं. कौर यांच्या उत्तरानं कार्यक्रमात उपस्थित असलेले सगळेच आवाक झाले. विशेष म्हणजे, सशक्त बेटी, समृद्ध बिहार या शिबिरात हरजोत कौर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाहा व्हिडीओ : मग तुम्ही कंडोमही फुकटात मागाल, महिला अधिकारीचं वक्तव्य

प्रकरण नेमकं काय? 

बिहारमध्ये एका ‘सशक्त बेटी, समृद्ध बिहार’ या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलींच्या जनजागृतीसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मुलींना या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. शिबिरात एका मुलींनं उपस्थित महिला आयएएस अधिकाऱ्याला सॅनिटरी पॅड्सबाबत प्रश्न विचारला. मुलीनं सरकार 20-30 रुपयांचं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला आयपीएस अधिकारी हरजोत कौर म्हणाल्या की, “या मागणीचा अंत आहे का? तुम्ही 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकता. तुम्ही उद्या जीन्स-पँट देऊ शकता, परवा शूज का देऊ शकत नाही? असे प्रश्न विचारले जातील. तसेच, जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो, तेव्हा कंडोम देखील विनामूल्य द्यावं लागेल.”

एका हिंदी वेबसाईटनं यासंदर्भातील वृत्त आणि व्हिडीओ प्रसिद्ध केला. बिहारमध्ये मंगळवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं महिला आणि बाल विकास महामंडळानं या शिबिराचं आयोजन केलं होतं. सध्या सर्वच स्तरातून महिला आयएएस अधिकाऱ्यावर टीका केली जात आहे. 

Related posts