ashok chavan claim on eknath shinde shivsena ncp congress alliance ashish shelar warns( प्रगत भारत । pragatbharat.com)

२०१९मध्ये राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारवर अनैसर्गिक युती म्हणून सातत्याने भाजपाकडून टीका करण्यात आली. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केलीच कशी? असा सवालही उपस्थित करण्यात आला. यासंदर्भातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. अशोक चव्हाणांच्या त्या गौप्यस्फोटाचे पडसाद आज राज्यात उमटू लागले असून त्यावरून आता भाजपाकडून आमदार आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाणांना जाहीर इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये बोलताना महाविकास आघाडीच्याआधी आधी फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव आल्याचा दावा केला आहे. “भाजपासोबत राहायचे नाही, ही शिवसेनेची भूमिका फडणवीस सरकारच्या काळातच झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव घेऊन शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे तत्कालीन वरीष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. या सर्वांनी माझ्या मुंबई कार्यालयात माझी भेट घेतली होती, असंही चव्हाण म्हणाले.

“शरद पवारांची भेट घ्या”

शिवसेनेच्या शिष्टमंडळाला शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले. “असं सरकार स्थापन करायचं असेल, तर तुम्ही आधी शरद पवारांशी चर्चा करा असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यानंतर ते शरद पवारांना भेटले किंवा नाही याबाबत मला काहीही माहिती नाही”, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सरकारचा प्रस्ताव; अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे शिंदेंची कोंडी

“…तर त्यांची अडचण होईल”

दरम्यान, अशोक चव्हाणांच्या या दाव्यावर आशिष शेलारांनी गंभीर इशारा दिला आहे. “अशोक चव्हाणांची क्लिपच आम्ही जाहीर केली, तर त्यांची अडचण होईल. आमचे मित्र आहेत ते. त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही. काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात. त्या प्रथा परंपरांचा आम्ही भंग करणार नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करणार नाही. त्यांच्या राजकीय कृतीवर आम्ही नक्कीच बोलू शकतो”, असं आशिष शेलार म्हणाले.Related posts