LokSabha: भाजपाने 100 नावांवर केलं शिक्कामोर्तब! पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री बैठक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 चा आकडा पार करण्याचा निर्धार केला आहे.. भाजपाने त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून, ‘अबकी बार 400 के पार’ अशी घोषणा दिली आहे. भाजपाने यासाठी उमेदवारांची छाननी सुरु केली असून, 100 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक समितीसह नरेंद्र मोदींची ही बैठक पार पडली. पुढील काही दिवसांत ही पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजपाच्या या पहिल्या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश असू शकतो. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी, अमित शाह यांची गुजरातच्या गांधीनगर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची लखनऊतून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. याशिवाय 2019 लोकसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झालेल्या मतदारसंघातील उमेदवारही जाहीर होऊ शकतात. 

नरेंद्र मोदींनी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसीत मोठा विजय मिळवला होता. पहिली निवडणूक त्यांनी 3.7 लाख मतांनी जिंकली आणि दुसरी निवडणूक जवळपास 4.8 लाख मतांनी जिंकली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रीक होऊ नये यासाठी इंडिया आघाडी प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 

दरम्यान गुरुवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत भाजपा नेतृत्वाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, केरळ आणि तेलंगणा यांच्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जे राज्यसभेचे खासदार देखील आहेत ते एप्रिल-मे मध्ये होणारी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या आमदारांमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय राज्यमंत्री (MoS) व्ही मुरलीधरन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या यादीत काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाऊ शकते. ज्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जाऊ शकतो. पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि बॉलीवूडचे दिग्गज शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी लढण्यासाठी भाजपा भोजपुरी स्टार पवन सिंगला मैदानात उतरवू शकते. याशिवाय मध्य प्रदेशात भाजपा धक्का देऊ शकतं. प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी न देता शिवराज सिंग चौहान यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. आगामी दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.

Related posts