Bengaluru Cafe Blast: आरोपीने टायमर ऑन करण्याआधी ईडली मागवली होती; मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. 1 मार्चला हा स्फोट झाला असून, कर्नाटक सरकारने सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही आरोपींना पकडू असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी सध्या तरी यामध्ये कोणत्या संघटनेचा हात असल्याने पुरावे हाती आले नसल्याचं सांगितलं आहे. 

बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले आहेत की, पूर्व बंगळुरूमधील माहिती तंत्रज्ञान कॉरिडॉरमधील ब्रूकफिल्ड भागातील झालेल्या स्फोटाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आईडीच्या सहाय्याने घडवण्यात आलेल्या या स्फोटाचा सध्या वेगाने तपास सुरु आहे. आतापर्यंत अनेक धागेदोरे हाती लागले असून, वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. याआधी शनिवारी, पोलीस सूत्रांनी सांगितलं की, रामेश्वरम कॅफे येथे शुक्रवारी झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाप्रकरणी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना धारवाड, हुब्बल्ली आणि बंगळुरू येथून ताब्यात घेण्यात आलं.

मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृह मंत्रालयासह बैठक घेतली. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करून घटनेचं संपूर्ण सत्य बाहेर येईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच अधिकाऱ्यांना कोणतीही हयगय न करता कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तपासाचा वेग वाढवण्यास सांगितलं आहे. 

याआधी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी आरोपी सीसीटीव्हीत दिसत असून, त्यांना लवकरात लवकर पकडलं जाईल असा विश्वास व्यक्त केला होता. दरम्यान यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे का हे स्पष्ट झालेलं नाही. 

“मास्क आणि टोपी घातलेला एक व्यक्ती बसने आला होता, त्याने कॅफेच्या काउंटरवरून रवा इडली विकत घेतली आणि एका जागी बसला. मग त्याने टायमर सेट केला आणि निघून गेला,” असं त्यांनी म्हैसूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. सर्व जखमी सुखरूप आहेत. पुढे ते म्हणाले “आम्ही लवकरच आरोपींचा शोध लावू. आरोपी बसमधून उतरताना, ऑर्डर घेताना, बसताना अशा अनेक वेळा कैद झाला असल्याने तो लवकरच सापडेल”.

2022 मंगळुरू प्रेशर कुकर स्फोट आणि शुक्रवारच्या घटनेत समानता दर्शविणाऱ्या काही गोष्टींबद्दल विचारण्यात आलं असता सिद्धरमय्या यांनी गांभीर्याने तपास सुरु असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी रामेश्वरम कॅफेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणीही केली आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींचीही भेट घेतली.

Related posts