आई-वडिलांच्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं मूल, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर…; पोलीसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: उत्तरखंडच्या (Uttarakhand) देहरादूनमधून (Dehradun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरात विवाहित जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. मृत्यू होऊन तीन दिवस झाल्याने त्यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मृत दांपत्याच्या शेजारी 4 ते 5 दिवसांचं जिवंत बाळ आढळलं आहे. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. पतीने उधारीवर पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. 

13 जून रोजी पोलीस कंट्रोल रुमला टर्नर रोडवरील एका घऱातून फार दुर्गंध य़ेत असून आतमध्ये मृतदेह असू शकतात अशी शंका व्यक्त करणारा एक फोन आला होता. यानंतर पोलीस तात्काळ टर्नर रोडवरील C13 बंगल्यावर पोहोचले. या घराच्या एका दरवाजाला बाहेरुन टाळं ठोकण्यात आलं होतं. तर दुसरा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पती आणि पत्नीचा मृतदेह खाली जमिनीवर पडलेला होता. तसंच हे मृतदेह फुगले होते आणि सडू लागले होते. खोलीत रक्ताचा सडा पडलेला होता. 

पोलिसांनी घराची छाननी केली असता त्यांना 4 ते 5 दिवसांचं एक लहान मूलं आढळलं. हे बाळ जिवंत होतं. यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलवत तपास सुरु केला. दरम्यान, मृतदेहांच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. जे काही रक्त आढळलं ते त्यांच्या तोंडातून आलेलं होतं. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले आहेत. 

एक वर्षापूर्वीचं झालं होतं लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह सापडले आहेत त्यांची ओळख पटली असून 25 वर्षीय काशिम आणि 22 वर्षीय अनम अशी त्यांची नावं आहेत. चार महिन्यांपूर्वीच ते येथे राहण्यास आले होते. सोहेल असं या घराच्या मालकाचं नाव आहे. मृतांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं असता काशिमने दोन लग्नं केली असल्याचं उघड झालं. पहिल्या लग्नापासून त्याला 5 वर्षांची एक मुलगी आहे. एक वर्षांपूर्वी त्याने अनमशी लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला होता. 

पहिली पत्नी नुसरतने पोलिसांना सांगितलं की, 2 ते 3 दिवसांपासून माझे पती फोन उचलत नाही आहेत. 10 जूनला रात्री 11 वाजता माझं त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. काशिफने मला सांगितलं होतं की, मी उद्या गावी जाणार आहे, कारण उधारीत घेतलेले 5 लाख रुपये परत करायचे आहेत. पण दोन ते तीन दिवसांपासून तो फोन उचलत नव्हता आणि नंतर तो बंद झाला. मी येथे आल्यावर पाहिलं असता घऱ बंद होतं. यानंतर मी सासू, सासरे आणि दीराला सांगितलं. 

प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचं दिसत असून तपास सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. 

Related posts