कामगारांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिरूर तालुक्यातील रांजणगांव एमआयडीसीमध्ये राबविण्यात आला मतदान जनजागृती कार्यक्रम

पुणे, दि. २८ :(pragatbharat.com) “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ शिरूर तालुक्यातील रांजणगांव एमआयडीसीतील साऊथको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी घेतली.

कामगारांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिरूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत रांजणगांव एमआयडीसी मधील साऊथको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कंपनीचे मनुष्यबळ प्रमुख विनय शर्मा यांच्यासह शिरूर विधानसभा स्वीपचे नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सशक्त व सक्षम लोकशाहीचा हा उत्सव असून शंभर टक्के प्रत्यक्ष मतदान करून तो सर्वांनी साजरा करायला हवा, असा संदेश देत कामगारांना यावेळी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करून मतदानाचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. यावेळी साऊथको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या २६० कामगारांना मतदानाची शपथ देण्यात आली, तसेच त्यांच्याकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावू असा विश्वास या कामगारांनी व्यक्त केला.

*शिरूर नगरपरिषद हद्दीत देखील जनजागृती कार्यक्रम संपन्न*स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शिरूर नगरपरिषद हद्दीत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, शहरातील हॉटेल्स, बस स्थानक, किराणा दुकाने व मोठे व्यावसायिक आदी ठिकाणांपर्यंत जाऊन मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि- स्वीप नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related posts