पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार

पिंपरी(pragatbharat.com) दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट, दर्जेदार, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवला आहे.‌ पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) शैक्षणिक समूहातील संस्थेमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संधी, संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे असे मत दक्षिण कोरियाच्या क्वांगवून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विभाग संचालक डॉ. सुंगवू बेंजामिन चो यांनी व्यक्त केले.

   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि क्वांगवून विद्यापीठ यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.‌ निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे पीसीईटी येथे कोरियन भाषा केंद्र, अल्प मुदतीचे पदविका अभ्यासक्रम, द्विपक्षीय संशोधन, कार्यशाळा आयोजित करण्यास मदत मिळणार आहे.

    यावेळी वुई ब्रिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टीना चो, क्वांगवून विद्यापीठातील इलेक्ट्रिकल आणि बायोलॉजिकल फिजिक्स आणि प्लाझ्मा बायोसायन्स रिसर्च सेंटर विभागाचे प्रा. नागेंद्रकुमार कौशिक, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीईटी आंतरराष्ट्रीय संबंध, संशोधन सल्लागार डॉ. दिनेश अमळनेरकर व विविध विद्याशाखेचे विभागप्रमुख उपस्थित होते.‌

    क्वांगवून विद्यापीठा बरोबर झालेल्या या सामंजस्य करारामुळे पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे कोरियन भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार असून या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोरियन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सेमीकंडक्टर या विषया मधील संशोधनाला चालना देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सीलेंस सुरु करण्यात येणार आहे. अल्पकालीन प्रशिक्षण अंतर्गत दोन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण हे या करारामधील वैशिष्ठ्य आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कोरिया मध्ये नोकारीच्या संधी उपलब्ध करून देण्याची तयारी वुई ब्रिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टीना चो यांनी दर्शविली. त्यामुळे पीसीईटीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांना अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. कोरियात जाऊन, संशोधन करणे, शिक्षण संस्थांना भेटी देणे, पदवी, पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे, शिक्षणाबरोबरच कोरियन संस्कृती, सामाजिक जडणघडण याची माहिती घेता येईल. त्याचप्रमाणे कोरियन विद्यार्थी पीसीईटी येथे येऊन शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होतील. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, कौशल्य विकास होण्यासाठी मदत होईल, असे डॉ. गिरीश देसाई म्हणाले.‌

   पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमांत करत आहे. अल्पावधीतच पीसीयुने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. जगातील ३३ पेक्षा अधिक विद्यापीठे, संस्था यांच्या बरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.

   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.

Related posts