पुणे (Pragatbharat.com -दि. ०१ जानेवारी २०२५) :- कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन लाखो आंबेडकरी अनुयायींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्रीपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
सुमारे १० लाख अनुयायी बुधवारी (दि. १) विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडून देखील होणारी गर्दी लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी विविध नेतेमंडळींनी देखील अभिवादनासाठी हजेरी लावली.
२०७ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाई महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून याठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.
बुधवारी २०७ व्या विजयदिनी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. समता सैनिक दलासह महार रेजिमेंट कडून विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आनंदराज आंबेडकर यांसह इतर नेत्यांनी भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केले.