बँक कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा! सलग 4 दिवस बँका राहणार बंद

मुंबई – विविध मागण्यांसाठी बँक कर्मचार्‍यांनी संपाचा इशारा दिला आहे. मे महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार या दिवशी बँक बंद आहेत. जर संप पुकारण्यात आला तर तो 30 आणि 31 मे असा राहणार आहे. म्हणजेच शनिवार ते मंगळवार अशा सलग 4 दिवस बँक बंद राहणार आहेत. याचा फटका बॅँक ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी संघटनेने सांगितले की, बँक कर्मचार्‍यांमध्ये अनेक मुद्यांवरून असंतोष असून, बँक आपल्या मागण्यांसाठी 30 आणि 31 मे रोजी संपावर जाणार आहेत, तर कॅथॉलिक सीरियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, फेडरल बँक आणि युको बँकेचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी आधीच संपावर आहेत. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईस फेडरेशन सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले की, संपूर्ण बँकिंग क्षेत्र सध्या गंभीर संकटात आहे आणि जवळपास प्रत्येक बँक कोणत्या ना कोणत्या आंदोलनात व्यस्त आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून बँकांकडून थर्ड पार्टीकडून अनेक कामे करून घेतली जात आहेत.

Related posts