Case Has Been Registered Under Mokka Against 32 Accused In Ambernath Firing Case( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ambernath firing Case  : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व 32 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे यातील आरोपी पंढरीनाथ फडके आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना मोठा झटका बसला आहे. यानंतर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मोठा दबाव असून पोलिस संपूर्णपणे एकतर्फी तपास करत असल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मला राजकीय वादातून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप फिर्यादी राहुल पाटील यांनी केल्यामुळे कुणाल पाटील आणि त्यांच्या दोन भावांचाही समावेश आरोपींमध्ये करण्यात आला होता. मात्र त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. तर दुसरीकडे पंढरीनाथ फडके यांच्यासह 10 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. 

पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी पंढरीनाथ फडके आणि अन्य दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी संपल्यानंतर आज या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने फडके यांच्यासह अन्य दोघांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी फडके यांच्यावतीने अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. सत्यन पिल्ले आणि अॅड. उमेश केदार यांनी युक्तिवाद करत पंढरीनाथ फडके हे तपासात संपूर्ण सहकार्य करत असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका आणि गाड्या जप्त करण्यात आल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. तर पोलिसांनी आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने या तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

सरकारी वकील आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी न्यायालयात या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास पोलिस आयुक्तांनी मान्यता दिल्याचे आदेश न्यायालयाला सादर केले. त्यामुळे फडके गटाला मोठा झटका बसलाय. मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह सर्व 32 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना आधी 14 दिवस पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीची कारवाई प्रस्तावित आहे. 

reels

दरम्यान, या प्रकरणात पोलिस सुरुवातीपासून एकतर्फी तपास करत असून पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप अॅड. मानसी म्हात्रे यांनी केला आहे. तर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगत इतर आरोपांवर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय तपास हा कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचं सांगितलं आहे.

Related posts