Todays Headline 23 November Aditya Thackeray To Meet Tejashwi Yadav Supreme Court Hearing On Bullock Cart Maharashtra Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे हे तेजस्वी यादवांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच राज्यातील बैलगाडा शर्यतीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. 

आदित्य ठाकरे तेजस्वी यादवांची भेट घेणार

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट दुपारी 3 वाजता होणार आहे. 

बैलगाडा शर्यतींबाबत आज सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी

Reels

बैलगाडा शर्यतीबाबत महाराष्ट्र आणि जलिकट्टूबाबत कर्नाटक, तामिळनाडूतील प्रकरणांवर आज एकत्रितरित्या सुप्रिम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता घटनापीठ याबाबत अंतिम निर्णय काय देणार याची उत्सुकता असेल. 

श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये आरोपी आफताबची पॉलिग्राफी आज होणार

श्रद्धा वालकर हत्याकांडामधील आरोपी आफताबची आज पॉलिग्राफी चाचणी होणार आहे. या हत्याकांडामधील अनेक प्रश्नांची उकल अद्याप झाली नाही. त्यामुळे आफताभची नार्को चाचणी करण्यात येणार आहे, पण त्याआधी त्याची पॉलिग्राफी करणे आवश्यक होतं. त्यासाठी आता न्यायालयाने परवानगी दिली असून आफताबची पॉलिग्राफी चाचणी आज करण्यात येणार आहे. 

निवडणूक आयोगात कागदपत्रं जमा करण्याचा शेवटचा दिवस

शिवसेना पक्षासंबंधित ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे. या कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक आयोग पक्षासंबंधी आणि त्याच्या चिन्हासंबंधित निर्णय देईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर आरे संदर्भात सुनावणी

मागील अनेक दिवसांपासून आरे प्रकरणाची सुनावणी खंडपीठासमोर येत नव्हती. सोबत आरे कारशेडच्या कामाला सुरुवात झाल्याने पर्यावरणप्रेमींनी ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली होती. आज या प्रकरणी मुख्य न्यायमूर्तींसमोर याची सुनावणी होणार आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक

हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी विधान भवनात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदारांची बैठक विधानभवनात पार पडेल. 

नव्यानं प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश

शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडीने मुंबई पालिका प्रभाग रचनेसंबंधित घेतलेला निर्णय बदलला. त्यामुळे नव्या निर्णयानुसार प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात आले. प्रभाग रचना संदर्भात कोंडी फुटल्याने लवकरच महानगरपालिका निवडणूका होण्याची शक्यता आहे.

रविकांत तुपकर जलसमाधी आंदोलनासाठी निघणार  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी आज बुलढाण्याहून निघणार आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या 600 कार्यकर्त्यांसह 60 ते 70 गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून सकाळी 9.30 वाजता निघणार आहे. या ताफ्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना , औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार आहेत. बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा-सिल्लोड-औरंगाबाद-नगर-पूणे मार्गे जाऊन मुंबईत येणार आहे.  24 नोव्हेंबरला सकाळीच मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत. 

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये पोहोचणार 

खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा आज महाराष्ट्रातील निमखेडी येथून निघून मध्यप्रदेशच्या सीमेवर पोहोचणार आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमालनाथ यांना काँग्रेसचा झेंडा सोपवणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 7.15 मिनीटांनी मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या भिंगारा फाटा येथे होणार आहे.

Related posts