Kalyan Police Arrested Most Wanted Iranian Criminal Who Crossed Half Century In Crimes



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kalyan Crime: कल्याणच्या कुख्यात फरार गुन्हेगाराला अटक करण्यात खडकपाडा पोलिसांना यश आलं आहे. पन्नास पेक्षाही अधिक गुन्हे (Crime) दाखल असलेल्या मोस्ट वॉण्टेड इराणी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. अलीहसन आबु इराणी असं इराणी गुन्हेगाराचं नाव आहे. पोलिसांच्या सापळ्यातून वाचण्यासाठी त्याने जंगलातील चिखलाच्या दलदलीतून  वाट काढत पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. तरी देखील पोलीस पथकाने त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत  चिखलाच्या दलदलीतून त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. मीरा भाईंदर पोलीस पथकासोबतच्या संयुक्त कारवाईत खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच इराणी वस्ती आहे. या इराणी वस्तीतून आतापर्यंत शेकडो इराणी गुन्हेगारांना पोलिसांनी विविध  गुन्ह्यांत अटक केली आहे. मात्र तरीही इराणी वस्तीत आजही गुन्हेगारांचा वावर असल्याचं दिसून येत असून जिल्ह्यात दुचाकी चोरी, धूमस्टाईलने  सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी असे विविध प्रकार घडतात. त्यातच  मीरा-भाईंदर परिसरात गेल्या आठ दिवसांत सहा ते सात ठिकाणी चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. एका घटनेतील सीसीटीव्ही फुटेज मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या हाती लागला. सदरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी  अली हसन आबु इराणी हा आंबिवली परिसरात असलेल्या इराणी वस्तीत राहणारा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण शहरातील खडकपाडा पोलिसांचे सात  जणांचे पथक मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकासह आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याचवेळी पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण गुन्हेगार अली हसन इराणीला लागली आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने आपल्या घरातील खिडकीतून उडी मारून काही अंतरावर असलेल्या जंगलामध्ये पळ काढला. मात्र सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी सावध होऊन फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग सुरू केला. 

दरम्यान, गुन्हेगाराने पोलिसांना चकवा देण्यासाठी झाडाझुडपात उडी घेत, चिखल अंगावर लावून घेत तो दलदलीत झोपला होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून गुन्हेगार  निसटला नाही. पोलिसांनी दलदलीतच त्याच्या अंगावर झडप घातली असता एका पोलिसात आणि गुन्हेगारात झटापट झाली. गुन्हेगाराने एका पोलीस अंमलदाराचे  तोंड चिखलाच्या दलदलीत खुपसले, त्याचवेळी  खडकपाडा पोलीस ठाण्याचे  एपीआय गायकवाड आणि त्यांच्या  पथकाने तात्काळ चिखलात धाव घेत त्या पोलीस अंमलदाराची गुन्हेगाराच्या तावडीतून सुटका करत त्याला पकडून अटक केली. तर,  खडपकडा पोलीस ठाण्यात पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हेगारावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Kedarnath Yatra: केदारनाथमध्ये घोड्यांना पाजला जातोय गांजा! व्हिडिओ पाहून रक्त उसळेल; घोडे चालकावर FIR दाखल

Related posts