Shivsena Uddhav Thackeray On Governar Bhagatsingh Koshyari Contravercial Statement On Shivaji Maharaj Marathi News ( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: ज्यांचं सरकार केंद्रात त्यांच्या विचारसरणीची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात, मग त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं जातं का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. केंद्राने हे सॅंपल परत न्यावं अन्यथा त्यांना महाराष्ट्रांचा इंगा दाखवणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वानी एकत्र यावं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे. 

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण याचा शोध घ्यायला हवा. राज्यपाल निष्पक्ष असावा, राज्यात काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक त्यांनी करावी. पण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटतात. आता राज्यपालांनी जे काही बोललंय ते गांभिर्याने घेण्याची गरज आहे. कुणीही व्यक्ती केवळ राज्यपाल म्हणून काहीही बोलला तर ते सहन करणे गरजेचं नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यात मराठी लोकांचा अपमान केला, सावित्रीबाई फुलेंच्याबद्दलही चुकीचं वक्तव्य केलं. आता शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा त्यांच्या पक्षाचा राजकीय कार्यक्रम आहे का असा प्रश्न पडतोय. आता जर राज्यपालांना हवटलं गेल नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन खणखणीत विरोध करुन दाखवलं पाहिजे. वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू , शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ. त्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता राज्यात मिंधे सरकार आल्यापासून कुणीही यावे आणि टपली मारुन जावे अशी अवस्था झाली आहे, महाराष्ट्राची सातत्याने अहवेलना सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

News Reels

Related posts