चिखली परिसरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या चिंताजनक आहे – नेताजी काशिद ( शिवसेना उपशहर प्रमुख )

पिंपरी-चिंचवड ( प्रगत भारत)| : चिखली परिसरातील मोरेवस्ती, साने वस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती या भागामध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. श्वानांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या श्वानांची वाढती संख्या चिंताजनक आहे. शहरात पशुवैद्यकीय विभाग कार्यरत असूनही श्वानदंशाच्या घटनांना आळा घालण्यात अपयश येत असल्याचे दिसते. या मोकाट श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा; अन्यथा महापालिका भवनाच्या आवारात मोकाट श्वानांना सोडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशिद यांनी दिला आहे.यासंदर्भात काशिद यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठिवले आहे. त्यात म्हटले आहे की, भटक्या श्वानांची वाढणारी संख्या अटोक्यात ठेवण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने श्वानांचे निर्बिजीकरण केले जाते. भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात ठेवणे आवश्यक असले, तरी त्यासाठी महापालिका स्तरावर केलेले काम अपुरे ठरत आहे. त्यामुळे श्वानदंशाच्या घटना सर्रास घडतात. रात्र पाळीसाठी कामावर निघालेले कामगार, दुसऱ्या पाळीवरून घरी परतणारे कामगार यांना या श्वानांचा नियमित त्रास सहन करावा लागतो. परिसरातील प्रत्येक सोसायट्या आणि कॉलन्यांमध्ये मोकाट श्वानांची दहशत निर्माण झाली आहे. श्वानांच्या वेळी अवेळी भुंकण्यांमुळे नागरिकांची झोप मोड होते. लहान मुले घाबरून जातात. शिवाय या श्वानांमुळे घरासमोर होणारी घाण ही तर मोठी समस्या झाली आहे. चारचाकी वाहने आणि दुचाकीस्वारांच्या मागेही हे श्वान लागतात. त्यातून अपघातही घडले आहेत.श्वानदंश झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांना जखम दाखवून उपचार सुरू करावे लागतात. त्यामुळे श्वानदंश झाल्यानंतर रेबिजचा धोका उद्भवू नये, यासाठी अँटी रेबिज सिरम हे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) उपलब्ध आहे. इतर रुग्णालयात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो. चिखली, जाधववाडी, चाकण या परिसरात श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत. श्वानदंशावर योग्य उपचार झाले नाही तर मृत्यूही ओढावू शकतो.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्वानांची संख्या कमी व्हावी म्हणून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम महापालिकेकडून करावे, तसेच लवकरात लवकर या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा; अन्यथा मोकाट श्वानांना क्षेत्रीय कार्यालय किंवा महापालिका आवारात सोडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असे हि सदर निवेदनात नेताजी काशीद यांनी नमूद केले आहे.

Related posts