योगायोग की भलतंच काही! सापाने एकाच व्यक्तीला 6 दिवसांत दोन वेळा दंश केला; दुसऱ्या वेळी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News: निसर्गाचे विविध रंग आहेत, जे अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करतात. याच निसर्गात अशा काही गोष्टी घडतात, ज्या योगायोग आहेत की अचानक घडल्यात हे समजत नाही. राजस्थानमध्ये अशीच एक घटना घडली आहे जिला योगायोग म्हणावं की, एखादा जुना सूड हे लोकांना समजत नाही आहे. याचं कारण एका विषारी सापाने एकाच व्यक्तीला 6 दिवसांत दुसऱ्यांदा दंश केला आहे. पहिल्या वेळी सापाने दंश केल्यानंतर ही व्यक्ती सुदैवाने वाचली होती. पण दुसऱ्या वेळी मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात आता चर्चेचा विषय ठरली आहे. तर दुसरीकडे मृतांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळलं आहे. 

जैसलमेरच्या फलसूंड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एक अजब घटना घडली आहे. मेहरानगड गावात राहणारे 44 वर्षीय जासब खान यांना एका आठवड्यापूर्वी विषारी सापाने दंश केला होता. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंहोतं. पोकरण येथे चार दिवस उपचार करुन जासब खान घरी परतल्यानंतर साप जणू काही त्यांची वाट पाहत होता. घऱी परतल्यानंतर सापाने पुन्हा एकदा त्यांना दंश केला. यानंतर त्यांना उपचारासाठी जोधपूरमधील रुग्णालयात नेण्यात आलं. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

भणियाना बॉर्डरवर येणाऱ्या ढाणी येथील या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. भणियाना पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक बैनीवाल यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितलं की, 44 वर्शीय जासब खान यांना 20 जून रोजी सापाने दंश केला होता. पोकरण येथे चार दिवस त्यांच्यावर उपचार झाले होते. डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं होतं. 

रुग्णालयातून सोडल्यानंर ते 26 जून रोजी घरी परतले होते. पण यावेळी पुन्हा एकदा सापाने त्यांना दंश केला. नातेवाईक त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात घेऊन गेले होते. पीडित व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याने त्यांना जोधपूरला नेण्यात आलं होतं. यावेळी मात्र डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. रुग्णालयाने माहिती दिल्यानंतर पोलीस पोहोचले होते. त्यांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 

मृत व्यक्तीचा नातेवाईक रईस खानने याप्रकरणी माहिती देताना सागितलं आहे की, 20 जूनला जोसब खान यांना वाळवंटात फिरत असताना सापाने पायाजवळ दंश केलं होतं. ते बरे झाल्यानंतर 26 जून घरात त्यांना सापाने दंश केला. पण यावेळी सापाने दंश केल्यानंतर त्यांच्या शरिरातील विष बाहेर पडू शकलं नाही. 

पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवला आहे.  नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. जोसब यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. जोसब यांच्यामागे पत्नी, चार मुली आणि 5 वर्षांचा एक मुलगा आहे. घऱात वयस्कर आईदेखील आहे. जोसब यांच्या जाण्याने कुटुंबाचं छत्र हरपलं आहे. दरम्यान, कुटुंबाने घऱात लपलेल्या या सापाला ठार केलं आहे. 

Related posts