Monsoon Tourism Huge Crowd At Lohagad In Lonavala On Sunday Pune Maharashtra



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lohagad fort: लोणावळा (Lonavala) शहर हे नेमकं पुणे (Pune) आणि मुंबईच्या (Mumbai) मध्यावर असल्याने विकेंडला नेहमीच तेथील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी असते. त्यात लोणावळा आणि मावळमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पर्यटकांची पाऊलं गडकिल्ल्यांकडे वळली आहेत. लोणावळ्यात असलेल्या लोहगडावर विकेंडला प्रचंड गर्दी होत आहे. रविवारी लोहगडावर (Lohagad) पर्यटकांची झुंबड उडाली होती. रविवारच्या सुट्टीमुळे अनेकांनी गडावर गर्दी केली आणि गडावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसल्याने गोंधळ उडाला. तब्बल चार तास गडावर गोंधळाचं वातावरण होते, याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही.

लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे लोणावळ्याचं निसर्ग सौंदर्य खुललं आहे. लोहगड हे लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण. रविवारच्या सुट्टीमुळे पुणे, मुंबईच्या पर्यटकांनी येथे तोबा गर्दी केली होती. खंडाळा (Khandala), कोरीगड (Korigad), विसापूर किल्ल्यावर (Visapur Fort) देखील पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. लोहगडला भेट देण्यासाठी सर्वाधिक पर्यटक असल्याने महादरवाज्यापर्यंत गर्दी वाढली होती. गड पर्यटकांनी फुल्ल झाल्याने चार तास पर्यटकांना मुख्य द्वारावर अडकून बसावे लागले होते. अखेर पर्यटकांनी एकमेकांशी समन्वय साधला आणि यातून मार्ग काढत ते गडाच्या खाली उतरले.

पावसात लोहगड किल्ला पर्यटकांना खुणावत असतो. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर या स्थितीवर अनेक रील्स बनवण्यात आले आहेत. पर्यटकांनी विकेंडला या किल्ल्यावर फिरायला येऊ नये, असं आवाहन आता करण्यात येत आहे. विकेंडच्या दिवशी फिरायला जाताना काळजी घेतली पाहिजे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणं टाळावं.

पुणे-मुंबईतील बरेच ट्रेकर्स ग्रुप शनिवारी आणि रविवारी ट्रेकिंगचा प्लॅन बनवतात. यात बराच कर्मचारी वर्ग आणि तरुण-तरुणाई सहभागी होतात. सुट्टीचा दिवस असल्याने ट्रेकिंग आणि गडकिल्ल्यांचं वेड असलेले लोक गडांवर गर्दी करतात. त्यामुळे पावसाच्या दिवसांत सुखद वातावरण अनुभवायचं असेल तर शक्यतो शनिवारी आणि रविवारी गडकिल्ल्यांवर जाणं टाळावं, असंही काहींनी सुचवलं आहे.

दरम्यान, लोहगडावरील या घटनेमुळे या ठिकाणी नियोजन तसेच समन्वयाचा अभाव असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. पावसाळ्याच पोलिसांनी देखील पर्यटन स्थळांवर गर्दीचं नियोजन करावं, असं आवाहन देखील आता करण्यात येत आहे.

हेही वाचा:

Viral Video: केदारनाथ मंदिरासमोर मुलीने केलं बॉयफ्रेंडला प्रपोज! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया



Related posts