…तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे ‘फटकारे’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उद्धव ठाकरे गटाने महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 9 वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर चित्र फारसे बदलेले नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. टोमॅटोचे दर 150 वर गेलेत तर अनेक भाजांनी त्रिशतक गाठलं असलं तरी केंद्रातील सरकार ढीम्म असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. टोमॅटोच्या शेतांवर डाका घालण्यात येत असल्याची प्रकरण समोर येत आहे तर टोमॅटो आता केवळ मिम्स आणि रिल्सपुरता मर्यादीत राहिला असून तो पेट्रोलपेक्षाही महाग झाला असल्याचं म्हणत ठाकरे गटाने या वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

मोदी राजवटीतही ना दरवाढ थांबली आहे, ना महागाई लपून बसली

“महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. मागील नऊ वर्षे सलग त्यांचीच केंद्रात सत्ता आहे, पण महागाई आणि दरवाढीबाबत स्थिती काय आहे? दरवाढ आणि महागाई बिळात लपून बसली आहे काय? वास्तव हेच आहे की, मोदी राजवटीतही ना दरवाढ थांबली आहे, ना महागाई लपून बसली आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून सोने-चांदी आणि चैनीच्या गोष्टींपर्यंत सगळ्यांचेच भाव आकाशाला भिडले आहेत. दैनंदिन जीवनातील भाजीपाला, फळफळावळ यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. टोमॅटोने तर कहरच केला आहे. किरकोळ बाजारातील टोमॅटोचे दर प्रतिकिलो 120 ते 150 रुपये एवढे वाढले आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या वापरावर आधीच महागाईमुळे निर्बंध आले आहेत. त्यात आता टोमॅटोचीही भर पडली आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

…तर सरकार म्हणून तुमचा जनतेला काय फायदा?

“पावसाला झालेला उशीर, त्याआधी बसलेले अवकाळी आणि गारपिटीचे तडाखे, त्यात झालेले शेतमालाचे नुकसान टोमॅटोच्या भाववाढीसाठी जबाबदार असल्याचे आता सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही, परंतु सगळेच जर निसर्गाच्या ‘भरोसे’ सोडायचे असेल तर सरकार म्हणून सत्तेत बसलेल्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यांचे काय? पेट्रोलच्या दरवाढीबद्दल हे कच्च्या तेलाच्या जागतिक दरवाढीकडे बोट दाखवितात. मग, जेव्हा हे जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत? या प्रश्नावर नेहमी हात वर करतात. तीच गोष्ट जीवनावश्यक वस्तू तसेच डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला-फळफळावळ यांच्या दरवाढीची. या दरवाढीसाठी ते कधी कमी उत्पादनाकडे बोट दाखवितात, तर कधी नैसर्गिक परिस्थितीच्या नावाने बोटे मोडतात. मग तुमची जबाबदारी आणि काम काय? महागाईचे खापर तुम्ही कधी यावर तर कधी त्यावर फोडणार असाल तर सरकार म्हणून तुमचा जनतेला काय फायदा?” असा प्रश्न ठाकरे सरकारने सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

9 वर्षांनंतरही ‘महंगाई डायन’ सामान्यांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव का घेताना दिसत नाही?

“आता टोमॅटो 150 रुपयांवर पोहोचला, तर त्याचेही खापर पावसावर फोडत आहात. कांद्याबाबतही वर्षानुवर्षे हेच होत आले आहे. कधी कांद्याचे दर एवढे कोसळतात की, शेतकऱ्याला तो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. कधी तो महाग होतो, परंतु ना कांदा उत्पादकाला लाभ होतो ना सामान्य जनतेला. तो होतो दलाल आणि व्यापाऱ्यांना. पुन्हा महागलेला कांदा राजकारण्यांच्या डोळ्यांत पाणी आणतो, असे म्हटले जाते. मात्र म्हणून कांदा दरवाढीने सामान्यांच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत याची खबरदारी सत्ताधारी घेतात असे नाही. मोदी राजवटीत तरी दुसरे काय घडत आहे? नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील निर्णयांचे ढोल तुम्ही सर्वत्र पिटत आहात. मग या नऊ वर्षांनंतरही ‘महंगाई डायन’ सामान्यांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव का घेताना दिसत नाही? नऊ वर्षांनंतरही तुमचे सरकार दरवाढ आणि महागाईचीच ‘डिलिव्हरी’ का देत आहे? पेट्रोल-डिझेलचे दर ‘परवडले’ एवढी टोमॅटोची भाववाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरापुढे पेट्रोल स्वस्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे,” असंही या लेखात म्हटलं आहे.

सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग

“रोजच्या जेवणातून गायब झालेला टोमॅटो सोशल मीडियावरील मिम्स, रील्स, व्हॉटस्ऍप मेसेज यावर दिसत आहे. ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. टोमॅटो हीदेखील चोरीची ‘चीज’वस्तू झाली आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात शेतातील अडीच लाख किमतीच्या टोमॅटो पिकावर ‘दरोडा’ टाकण्यात आल्याची तक्रार तेथील पोलिसांत दाखल झाली आहे. मध्यंतरी कांदा हा असाच चोरण्याची वस्तू झाला होता. सध्या भाजीपाल्यापासून कडधान्यांपर्यंत अनेकांनी दराचे शतक गाठले आहे. कोथिंबीर, आले, मिरची, वाटाणे यांनी त्रिशतकी मजल मारली आहे. लसूणही त्यात मागे नाही. त्यात टोमॅटोने प्रतिकिलो 150 रुपयांचा पल्ला गाठला आहे. तामीळनाडूमध्ये टोमॅटो रेशन दुकानात पोहोचला आहे. पण स्वस्ताईच्या हवाल्याने नऊ वर्षांपूर्वी केंद्रातील सत्तेत बसलेले मोदी सरकार काय करीत आहे? भाजीपाल्याच्या दराने ‘त्रिशतक’ गाठले आहे, टोमॅटो भडकला आहे, जनता ‘लालबुंद’ झाली आहे. तिकडे मणिपूर पेटलेलेच आहे. मोदी सरकार मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि ढिम्म आहे. नऊ वर्षांच्या सत्ताकाळाचे ढोल पिटत आहे, फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहे. महागाईच्या वणव्याची आणि त्यात होरपळणाऱ्या जनतेची या सरकारला जाणीव आहे काय?” असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.

Related posts