घऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका आयुर्वेदिक डॉक्टराच्या 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटी होती. घरात चोरी करण्याच्या हेतूने आरोपी घुसला होता. आरोपीने सर्वात आधी 7.5 लाख रुपये लुटले आणि नंतर मुलीची हत्या करुन पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे. 

ईकोटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी केली जात असून, काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईकोटेक-3 क्षेत्रातील सेक्टर 147 मध्ये सरस्वती इन्क्लेव्ह आहे. येथे राहणारे डॉक्टर सुदर्शन बैरागी यांचं गेझा परिसरात क्लिनिक आहे. मंगळवारी डॉक्टर बैरागी आपली पत्नी आणि दोन मुलांसह दवाखान्यात गेले होते. घऱात त्यांची 14 वर्षीय मुलगी शिल्पी होती. दुपारी 1.30 वाजता डॉक्टर बैरागी घरी आले तेव्हा त्यांची मुलगी बेडवर बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या तोंडातून रक्त वाहत होतं. घरातील सामान विखुरलेलं होतं आणि पैसे गायब होते. 

पोलिसांची पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न

मुलीला घेऊन कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली असता तिला मृत घोषित करण्यात आलं. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी 45 वर्षीय प्रदीपवर संशय असल्याचं सांगितलं, यानंतर पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला घेऊन जेव्हा चोरी केलेली रक्कम मिळवण्यासाठी जात होतो तेव्हा त्याने रस्त्यात लघुशंकेसाठी थांबवलं. यावेळी त्याने पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाठलाग केला असता त्याने गोळीबार केला. उत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला असता तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोर्टाने न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. 

आरोपी प्रदीप हा डॉक्टर सुदर्शन बैरागी आणि त्यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखत होता आणि नेहमी त्यांच्या घरी जायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कुटुंबाने आधी 25 लाख चोरी झाल्याचा दावा केला होता. पण पोलिसांना आरोपीकडे 7.5 लाख रुपये सापडले आहेत. कुटुंबानेही आपला अंदाज चुकला असावा असं मान्य केलं आहे. 

“वडिलांची भेट घेतली, नंतर मुलीला ठार केलं”

डॉक्टर बैरागी यांना फ्लॅटच्य व्यवहारातून 7.5 लाख मिळाल्याची माहिती आरोपी प्रदीपला होती. हत्येच्या दिवशी त्याने डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली तेव्हा ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरी नसतील असं त्याला समजलं. घरात मुलगी एकटी असल्याची माहितीही त्याला मिळाली. यानंतर त्याने घर गाठलं. शिल्पीनेही पाणी प्यायचं असल्याने त्याला दरवाजा उघडून घरात घेतलं. यानंतर त्याने तिला धमकावत दागिने आणि पैसे लुटले. पण शिल्पी आई-वडिलांनी सांगेल अशी भीती वाटल्याने त्याने तिची गळा दाबून हत्या केली. 

Related posts