Video : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) उज्जैन (Ujjain National Book Fair) येथील राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी पुस्तक विकणाऱ्याला मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. दुकानदार महिलांचे फोन नंबर घेऊन मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) दुकानदाराविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 1 सप्टेंबरपासून हा ग्रंथ मेळा सुरू आहे. पंजाबचा रहिवासी राजा वकार सलीम याने जत्रेत पुस्तकांचा स्टॉल लावला आहे. तो 14 क्रमांकाच्या दुकानात ‘अहमदिया मुस्लिम कम्युनिटी’ या नावाने पुस्तकांची विक्री करतो होता. 3 सप्टेंबर रोजी हा सगळा प्रकार घडला. राजा वकार सलीम याने काही महिलांना त्यांचा मोबाईल क्रमांक मागितला तेव्हा हा सगळा वाद सुरू झाला. याच कारणावरुन महिलांनी राजा वकार सलीमला मारहाण केली. विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा रितू कपूर यादेखील तिथे उपस्थित होत्या.

“वकार सलीम पुरुषांना व्हिजिटिंग कार्ड देत होता आणि महिलांना पुस्तके पाठवण्याच्या बहाण्याने त्यांचा फोन नंबर रजिस्टरमध्ये लिहून घेत होता. त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली,” असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा रितू कपूर यांनी केला.

दुकानदाराने दिलं स्पष्टीकरण

दुसरीकडे, या मारहाणीनंतर वकार सलीमचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये वकार सलीमने एका महिलेने कुराणचे हिंदीत भाषांतर असलेले पुस्तक मागितले होते. यासाठी महिलेने तिचा नंबरही दिला होता. त्यांना पुस्तके हवी होती म्हणून त्यांनी नंबर दिला असे वकार सलीमने सांगितले.

“अहमदिया मुस्लिम समुदाय सर्वांचा आदर करतो. ‘सर्वांसाठी प्रेम, कोणासाठीही द्वेष नाही’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. मला पोलिस ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. माझ्या बहिणींना माझ्याकडून काही त्रास असेल तर मी हात जोडून माफी मागतो. मी ग्वाल्हेर येथील अहमदिया मुस्लिम कम्युनिटी, इंडियाच्या मिशनरी ऑफिसमधून इथे आलो आहे. तुम्ही ऑफिसच्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलू शकता. मी फक्त महिलांचेच नंबर घेतलेले नाहीत. माझा एक मित्रही आला आहे. मी. तो आता आराम करण्यासाठी गेला आहे. हे सर्व लोक माझ्याकडे आले. मला पुस्तकांची माहिती विचारली. नंतर कुराणचे हिंदीत भाषांतर मागितले. मी म्हणालो की माझ्याकडे ते आता नाही, पण तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यासाठी त्यांनी मला फोन नंबर दिला,” असे वकार सलीमने सांगितले.

पोलिसांनी दिली माहिती

घटनेची माहिती मिळताच माधवनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दुकानदाराला पोलीस ठाण्यात नेले. पुस्तकांच्या मेळाव्यात कस्टमर सर्व्हिस पॉईंटवर तैनात असलेल्या दीपिका शिंदे यांनी मारहाण होत असताना तिथे धाव घेतली आणि वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे पुस्तक मेळ्यात विनयभंगाची तक्रार आली होती. त्या संदर्भात तपास सुरू आहे. दुकानदाराची संपूर्ण माहिती काढली जात आहे, असे दीपिका शिंदे यांनी सांगितले.

Related posts