Swarajya Sanghatana Sambhaji Raje Public Meeting At Yeola Nashik Raised Question On Development To Chhagan Bhujbal( प्रगत भारत । pragatbharat.com)

येवला, नाशिक:  गेल्या अनेक वर्षांपासून इथले प्रतिनिधी मंत्रीपदे उपभोगत आहेत, मात्र येवल्यात ना शिक्षणसंस्था, ना एमआयडीसी, ना कांद्याचे प्रोसेसिंग युनिट मग वीस वर्षांत नेमकं काय केलं असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांची उत्तरे द्यावी, नाहीतर 2024 दूर नाही, असा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी थेट छगन भुजबळ यांनाच आव्हान दिले आहे. 

आज स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर होते. आज दिवसभर येवला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर लासलगावमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी येवल्याचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. येथील स्थानिक प्रश्नांना हात घालत वीस वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असुनही अद्याप येवल्यात विकासगंगा नसल्याचे सांगत भुजबळांचे कान टोचले. ते म्हणाले की, राजकारणात सध्या अस्वस्थता, सामान्य माणूस कंटाळला आहे. कोणीही महाराष्ट्राचा आदर्श घेवू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू असून राजकारणावर बोलण्यास कंटाळा यायला लागला आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं काय सुरू कुणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे आता राजकारणाविषयी बोलायचे नाही, असं मी ठरवलं असून फक्त सुसंस्कृत महाराष्ट्रा विषयी बोलायचे ठरवले, असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले की, आज नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर येवला मतदारसंघात फिरलो. अनेक गावांना भेटी दिल्या, अनेक शेतकऱ्यांशी बोललो. त्यामुळे आजच्या सभेत येवल्याच्या बाबतीत बोलणार आहे. आज तालुक्यात 25 शाखांचे उद्घाटन केले. अनेकांनी आमच्याशी संवाद साधला. अनेक गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. इथल्या आमदारांना, मंत्र्यांना मतदान केलं, पण आमच्यावर अन्याय होतो, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. याच दरम्यान एक मुलगा भेटला, तो म्हणाला की, आतापर्यंत सर्वच राजकिय पक्षांना मतदान करत आलो, मात्र सगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला फसवले. तुम्ही स्वराज्यच्या माध्यमातून आम्हाला तसेच फसवणार आहात का? असा सवाल केला. मात्र मी त्याला आम्हाला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असा आशावाद दिल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

संभाजी राजे पुढे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. त्यांना मावळ्यांनी साथ दिली. म्हणून आम्हीही सामान्य माणसांना सोबत घेवून स्वराज्य निर्माण करणार आहोत. त्यासाठी गावोगाव पिंजून काढत आहोत, यातूनच स्वराज्याची उभारणी सुरू केली आहे. आज येवला तालुक्यातील दरसवाडी – पूनेगाव कालवाजवळ शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. जवळपास 60 किमीचा भुजबळांचा प्रकल्प आहे. मात्र शेतकऱ्यांना पाण्याचे स्वप्न दाखवले. या कालव्यात एकदाच पाणी आणले. ते पण ओव्हरफ्लो पाणी आले होते. पण सध्या कालवा नाही, पाणीही नाही. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी नाही, शेततळे नाहीत, अशा शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचा फायदा झाला असता, मात्र तसे झालं नाही. केंद्रात, राज्यात तुमचंच सरकार आहे ना, मग का नाही आल पाणी असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. 

शरद पवार यांनी प्रश्न का विचारला नाही…

येवल्यात अनेक गोष्टीचा प्रश्न आहेत, मात्र विरोधकही प्रश्न विचारत नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार येवल्यात आले होते, मात्र त्यांनी देखील याबाबत प्रश्न विचारले नाही, शरद पवार यांनी हे प्रश्न विचारायला पाहिजे होते. ते शरद पवार यांचे चेले आहेत. पवारांनी का नाही विचारलं त्यांना ते गुरू आहेत. येवला मतदारसंघात इतक्या वर्षांपासून काम करत आहेत, मग अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न पवारांनी विचारायला हवं होते, अशी अप्रत्यक्ष टीका संभाजीराजे यांनी भुजबळांवर केली आहे. 

कांद्याचे प्रोसेसिंग युनिट का नाही?

एकीकडे नाशकात सर्वाधिक कांदा उत्पादन होते. मात्र मागील काळात पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यावर सरकार अनुदान देणार होते. येथील मंत्री महोदय सरकार मध्ये आहात ना? मग जाहीर केलेले अनुदान कधी देणार असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित करत नाफेडने 2410 रुपयाने कांदा खरेदी करत असल्याचे सांगितले. मात्र या संस्थेने कांदा करताना अनेक अटी लावल्या आहेत. चांगला कांदा खरेदी करतात. मग दुसरा कांदा कोणी खरेदी करायचा असा जाब नाफेडला विचारला. लासलगाव मध्ये कांद्याची एवढी मोठी बाजारपेठ असताना कांद्याचे प्रोसेसिंग युनिट का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. नुकताच पाऊस पडला, कांदा लागवड सुरू झाली. पण पुन्हा पाऊस नाही पडला तर तुमच्याकडे काय दुसरी लाईन ऑफ अँक्शन आहे. एकीकडे शेतकऱ्याने कांदा पिकवला तर त्यावर 40 टक्के निर्यात लावली. मग शेतकऱ्यांनी कांदा विकायचा कसा? निर्यात शुल्क वाढविल्यानंतर लगेचच 
अफगाणिस्तानमधून का कांदा आयात केला असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. 

एकही एमआयडीसी नाही….

आज येवला दौरा करत असताना येथील एमआयडीसी पाहण्यासाठी गेलो. मात्र रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. येथील मंत्री महोदय नुकतेच सरकारमध्ये सामील झाले. नऊ महिन्यांसाठी ते येवल्याच्या विकासासाठी सत्तेत गेले, आता नऊ महिन्यांत येवल्याचा काय विकास  साधणार काय माहित, असा खोचक टोला भुजबळांना लगावला. तर एमआयडीसी बघण्यासाठी गेलो तर एमआयडीसी सापडलीच नाही, पण एमआयडीसी बघून आलो. इथं जवळपास 350 एकर जागा पडून आहे, इथं एखादी एमआयडीसी उभी राहु शकते. यासाठी जिंदाल यांना इकडे बोलवणार आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना कॉल करून इथे बोलवणार आहे.  एवढं सगळं असताना येवल्यात एमआयडीसी का सुरू होवू शकत नाही, असा प्रश्न दोन्ही मंत्र्यांना असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

थेट भुजबळांना आव्हान

यावेळी संभाजीराजे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, इथल राजकारण माधव आणि मराठा यावर चालतं. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती घेवून स्वराज्य निर्माण केलं होतं. मात्र आता इथे जातीचे राजकरण करून इलेक्शन लढायचा सुरू आहे. जाती पातीचे राजकारण न करता विकासावर राजकारण का नाही करत असा सवाल आहे. मराठा आणि ओबीसी यात भांडणे लावली जात आहेत? जातीच्या पलीकडे जावून विकास करा अन् राजकारण करा, या येवला मतदारसंघात एक शिक्षण संस्था नाही, नाशिक व मुंबईत त्यांची संस्था, मग वीस वर्षांत इथे शिक्षण संस्था का नाही, असे टीकास्त्र भुजबळांवर सोडले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आजच्या माझ्या सभेतील प्रश्नांचे उत्तरे द्यावी. मी पुन्हा इथे सभा घेईल, विकास दाखवला तर छञपती आशीर्वाद देतील. नाहीतर 2024 दूर नाही. स्वराज्य ‘ काय आहे दाखवून द्यावे लागेल, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता आव्हान दिले आहे.

Related posts