तेल न वापरता अशी करा पारंपारिक ऋषीची भाजी; ऋषीपंचमीच्या व्रताहाराला आहे खास महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rishi Panchami Special Bhaji: गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार सातही ऋषींच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. ऋषीपंचमीच्या दिवशी एक खास पद्धतीने भाजी केली जाते. आज काळानुसार ऋषीपंचमीचे व्रत आणि ऋषीपंचमीची भाजी ही लुप्त झाली आहे. कित्येक घरात अजूनही ही भाजी केली जाते. ही भाजी कशी करावी याची सोपी रेसिपी जाणून घेऊया. 

ऋषीपंचमीचे व्रत म्हणजे काय?

या दिवशी कश्यप, भारद्वाज, विश्वमित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टांचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करावे असं शास्त्रात सांगितलं आहे. 

ऋषिपंचमीला करतात या भाज्या 

अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. 

ऋषीपंचमीची भाजी करण्याची कृती

साहित्य

वरील दिलेल्या सर्व भाज्या चिरुन घेणे, सात-आठ मिरच्या, थोडा चिंचेचा कोळ, दोन वाट्या खवलेलं खोबरं, चवीपुरतं मीठ

कृती

सर्वप्रथम सर्व भाज्या एका ताटात एकत्र करा त्यानंतर मिरचीचा ठेचा करुन भाज्यांना लावून घ्या. नंतर भाज्यांना मीठ लावून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. 

भाज्या व्यवस्थित मिक्स करुन घेतल्यानंतर गॅसवर एक जाड पातेले ठेवा. त्यानंतर तेल न वापरता भाज्या थेट भांड्यात शिजायला टाका. अधे मधे भाज्या परतत राहा. 

ऋषीच्या भाजीसाठी लागणाऱ्या बहुतेक भाज्या या रसभाज्या असतात त्यामुळं त्यांना पाणी सुटते व भाजी चिकटतही नाही. तसंच, भाजीला आधीच मीठ लावून घेतल्याने जास्त पाणी घालण्याचीही आवश्यकता नाही. आवश्यकता असेल तरच पाणी घाला. 

भाजी थोडी शिजत आली की त्यात चिंचेचा कोळ घाला आणि संपूर्ण भाजी शिजली की वरुन खोबरं टाकून ढवळा. ऋषीची भाजी तयार

Related posts