( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. साधारण 45 दिवसांचा प्रवास केल्यानंतर हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. त्यानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडर आणि त्यातून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या प्रज्ञान रोव्हरनं तेथील भूमीची झलक पृथ्वीवासियांना दाखवली.
कौतुकाची बाब म्हणजे चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरमुळं चंद्रावर जाणवलेल्या भूकंपाचीही माहिती मिळाली. ज्यानंतर चंद्रावरील दिवस मावळला आणि 14 दिवसांच्या मेहनतीनंतर लँडर आणि रोव्हर झोपी गेले. चंद्रावर कालांतरानं पुन्हा सकाळ झाली. पण, त्यावेळी मात्र चांद्रयानाचे हे दोन सेनापती मात्र जागेच झाले नाहीत. आता त्याच लँडर आणि रोव्हराबाबत माजी इस्रोप्रमुखांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
Isro चे माजी अध्यक्ष एएस किरण यांनी केलेलं वक्तव्य भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या सांगतेकडे खुणावताना दिसत आहे. त्यांच्या माहितीनुसार येत्या काळात लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रिय होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. मागील काही दिवसांपासून इस्रो सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण, तसं होत नसल्यामुळं आता भविष्यातील आशा धुसर होताना दिसत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लँडर आणि रोव्हर सक्रिय व्हायचेच असते तर आतापर्यंत ते सक्रिय झाले असते असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याला सद्यस्थितीचा आधार दिला. ज्यामुळं आता चांद्रयान 3 मोहिमेकडून आणखी आशा लावून बसलेल्यांचा हिरमोड झाला आहे.
मोहिमेतून काय साध्य झालं आणि भविष्याच्या दृष्टीनं त्याचा फायदा काय?
चांद्रयान 3 नं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. त्यामुळं आता तो दिवस दूर नाही, जेव्हा चंद्रावरील एखादी गोष्ट पृथ्वीवर आणली जाईल, त्याबाबतच्या योजना आखण्यात येतील; असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. चांद्रयान 3 मोहिमेतून भारताला काय मिळालं? या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जिथं कोणीच पोहोचू शकलं नाही तिथं भारत पोहोचला आणि हेच मोठं यश आहे ही बाब त्यांनी पुन्हा प्रकाशात आणली. ही मोहिम भविष्यातील इतर मोहिमांसाठी मोठी मदत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.