Shardiya Navratri 2023 3rd Day Devi Chandraghanta Pooja Know All Rituals In Detail



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shardiya Navratri 2023: अश्विन नवरात्रात (Navratri 2023) देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपाची पुजा दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा तर तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची पुजा केल्यानं संकट निवारण होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जाणून घेऊयात चंद्रघंटा देवीची आख्यायिका…

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचं नाव ‘चंद्रघंटा’ आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. तसेच, संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचं मन ‘मणिपूर’ चक्रात प्रविष्ट होतं. चंद्रघंटेच्या कृपेनं अलौकीक वस्तुचं दर्शन होतं. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचं हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला ‘चंद्रघंटा देवी’ असं म्हटलं जातं. चंद्रघंटा शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रं आहेत. तिचं वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.

माँ चंद्राघंटाच्या कृपेनं भक्तांचं सर्व पाप आणि संकट दूर केलं जातं. माँ भक्तांच्या संकटाचं निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचं रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचं रूप अत्यंत सौम्य आणि शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.

आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपलं मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारिक संकटातून मुक्ती मिळते. आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावं. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचं लक्ष आहे.

चंद्रघंटा देवीचा मंत्र

पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Related posts