Wakad Crime News : धक्कादायक! आठ वर्षीय मुलाने बाहुलीला फाशी देऊन स्वतः घेतला गळफास

( प्रगत भारत । pragatbharat.com)

थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षाच्या मुलाने घरात खेळत असताना बाहुलीला फाशी दिली आणि बहुलीचा जीव गेला असल्याचा समज करून त्याने स्वतः देखील गळफास घेतला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

कमल खेम साउद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कमल रविवारी त्याच्या खोलीत बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी त्याची आई घरात काम करत होती, तर वडील बाहेर गेले होते. कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिले. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्याने त्याने घरातील खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कमलच्या आईने काम करत असताना त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो बाहुलीसोबत खेळत होता. काही वेळाने आईने पाहिले असता कमल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

आईने कमलकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एखाद्या कैद्याला ज्याप्रमाणे फाशी देतात त्या प्रमाणे बाहुलीच्या तोंडाला कापड गुंडाळले होते. कमल हॉरर फिल्म पाहत असे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Related posts