Video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu threatened the people planning to travel by Air India on 19th November

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Air India 19th November : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) नेहमी भारताविरुद्ध काही ना काही गरळ ओकत असतो. हमासने इस्रायलवर जसा हल्ला केला आहे तसाच हल्ला भारतावरही करू, अशी धमकी पन्नूने काही दिवसापूर्वी दिली होती. अशातच खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये. 

आम्ही शीख लोकांना 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास न करण्यास सांगत आहे. संपूर्ण जगातील लोकांसाठी ही नाकाबंदी असेल. त्यामुळे तुम्ही 19 नोव्हेंबरला म्हणजेच ज्या दिवशी वर्ल्ड कपची फायनल खेळली जाईल, तेव्हा एअर इंडियाने प्रवास करू नका, अन्यथा तुमच्या जीवाला धोका होईल, असं गुरपतवंत सिंग पन्नू याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळ 19 नोव्हेंबरला बंद राहील आणि त्याचे नाव बदलले जाईल, असा दावा देखील पन्नूने केलाय.

कोण आहे हा पन्नू?

गुरपतवंत सिंग पन्नू याचा जन्म 14 फेब्रुवारी 1967 रोजी पंजाबमध्ये झाला होता. शिक्षणही भारतात पूर्ण केलं. वडील पंजाबमध्ये एका कंपनीत काम करत होते. पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून कायद्याचे शिक्षण घेतलं. पन्नूने 2007 मध्ये ‘सिख फॉर जस्टिस’ ही संघटना स्थापन केली होती. सध्या तो कधी कॅनडा तर कधी अमेरिकेत असतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. 2020 च्या जुलैमध्ये भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केलं होतं. पन्नू आयएसआयच्या मदतीने खलिस्तान मोहीम चालवत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या हाती आली होती.

दरम्यान, गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर संपूर्ण भारतात गुन्हे दाखल आहे. दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये याचा जास्त प्रभाव असल्याने एकूण 16 गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. यूएपीए अंतर्गत देखील गुन्हा त्याच्यावर नोंदवल्यात आला आहे. एकूण 9 प्रकरणांमध्ये पन्नूला आरोपी मानलं गेलंय. पंजाबला भारताचा भाग मानत नाही आणि तो स्वतंत्र करु. इस्रायलच्या धर्तीवर भारताने पंजाबवर ताबा मिळवला आहे. भारताने हिंसाचार सुरू केला तर आम्हीही हिंसाचार सुरू करू, अशी गरळ पन्नूने ओकली होती.

Related posts