ओ वुमनिया! गोळ्या घालणाऱ्यांचा महिलेकडून झाडू घेऊन पाठलाग; VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हरियाणाच्या भिवनी येथे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत अविश्वसनीय घटना कैद झाली आहे. येथील घराबाहेर एक व्यक्ती उभा असताना दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केला. यावेळी शेजारच्या घरातील महिला झाडू घेऊन आली आणि हल्लेखोरांना पळवून लावलं. हे सीसीटीव्ही दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याची ओळख पटली असून हरिकिशन असं त्याचं नाव आहे. रवी बॉक्सच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे. त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. हरिकिशन सध्या जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वी भिवनी पोलिसांनी हरिकिशनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपात 5 जणांना अटक केली होती. 

भिवनीच्या डाबर कॉलनीत सोमवारी सकाळी 7.30 वाजता हा हल्ला झाला. हल्लोखोरांनी एकूण 9 गोळ्या झाडल्याचं ऐकू येत आहे. हल्ल्यात हरिकिशन जखमी झाला आहे. पोलीस अधिकारी दीपक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जखमीला पीजीआयएमएस रोहतक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असल्याची माहिती दिली. तसंच पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज पडताळत असून हल्लोखोरांचा शोध घेत आहेत. 

सीसीटीव्हीच्या सुरुवातीला हरिकिशन आपल्या घराबाहेर गेटजवळ निवांत उभा असल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच दोन बाईक येऊन त्याच्याजवळ थांबतात. बाईकवरुन खाली उतरताच दोघेजण गोळीबार सुरु करतात. हरिकिशन जीव वाचवत गेटच्या दिशने पळत जातो. यावेळी पायाला गोळी लागल्याने तो खाली कोसळताना दिसत आहे. पण अखेर तो गेटमधून आत जाण्यात यशस्वी होतो. 

यादरम्यान हल्लेखोर गेटच्या बाहेरपर्यंत पोहोचलेले असतात आणि गोळीबार सुरुच असतो. तेदेखील गेटमधून आत जाण्याच्या प्रयत्नात असतात. पण त्याचवेळी एक महिला तिथे धावत येते. हातात झाडू पकडलेली महिला थेट हल्लोखोरांवर धावून जाते. यानंतर हल्लेखोरही घाबरुन तेथून पळ काढतात. 

हल्लोखोर बाईकवरुन पळून जाताना महिलेवरही गोळी झाडतात. पण तिला गोळी लागला नाही. यानंतर ते बाईकवर बसून सुसाट पळतात. दरम्यान ही महिला शेजारी आहे की हरिकिशनची नातेवाईक हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हल्लोखोर पळून गेल्यानंतर ती घऱात जाऊन हरिकिशनची चौकशी करताना दिसत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, महिलेने दाखवलेल्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे.

Related posts