गुजरातमध्ये अवकाळी पाऊसामुळे विध्वंस; वीज पडून 20 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gujarat Rain : रविवारी राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता देशभरातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने देखील (SEOC) पावसामुळे किमान 40 जनावरे देखील मरण पावल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातही रविवारी विविध भागात अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे ठाणे आणि पालघरमधील अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. वीज कोसळल्यामुळे ठाण्यातील एका इमारतीला आग लागली. तर दुसरीकडे पालघरमध्ये एका रस्ता अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतला.

गुजरातमधील विविध जिल्ह्यांत पावसामुळे एकूण 20 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात पडलेल्या तीव्र अवकाळी पावसाच्या दरम्यान विजेच्या धक्क्याने हे मृत्यू झाले. रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुजरातमधील 251 पैकी 220 तालुक्यांमध्ये 50 मिमी पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि पिकांचे नुकसान झालं. अहमदाबाद शहरात सकाळी दोन तासांत 15 मिमी पाऊस झाला. संध्याकाळी देखील शहरात जोरदार पाऊस झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाहोदमध्ये चार, भरूचमध्ये तीन, तापीमध्ये दोन, आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला. अमित शहा यांनी आश्वासन दिले की स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. “गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात गुंतले आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,” असे अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त, सौराष्ट्रातील मोरबी जिल्ह्यातील सिरेमिक उद्योगाचेही मोठं नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सौराष्ट्रातील कारखाने बंद पडले आहेत. हवामान खात्याने म्हटले आहे की सोमवारी पाऊस कमी होईल आणि तो गुजरात आणि सौराष्ट्रच्या दक्षिण भागात मर्यादित असेल. ईशान्य अरबी समुद्रातील चक्रीवादळ निर्माण झालं आहे, ज्याचा परिणाम सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात होत आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कोसळत आहे.

Related posts