अरविंद केजरीवालांनी थेट सनी देओलशी घेतला पंगा, म्हणाले ‘हे असले मोठे लोक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलवर जोरदार टीका केली आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघातील अनुपस्थितीचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल यांनी सनी देओलला लक्ष्य केलं. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सनी देओलसारखे हे मोठे लोक काही करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मतदारांनी आम आदमी पक्षाला निवडून द्यावं असं आवाहन केलं. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

“तुम्ही लोकांनी मागील वेळी सनी देओलला निवडून दिलं. पण तो आजपर्यंत इथे फिरकला नाही. मग नेमका फायदा काय झाला? तो एक मोठा अभिनेता असल्याचं आपल्याला वाटलं होतं. जर त्याला निवडून दिलं तर तो काहीतरी करेल अशी आशा होती. पण ही मोठे लोक काहीच करत नाहीत,” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. 

“यावेळी आम आदमी पक्षाला मत द्या. किमान त्यांचा काहीतरी फायदा तरी होईल. या सर्व पक्षांच्या फसवणुकीला बळी पडू नका. त्यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या कामाचे विश्लेषण करा आणि त्यानुसार मतदान करा,” असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. 

गुरुदासपूरमधील अनेक स्थानिकांनीही सनी देओलने या मतदारसंघाला भेट दिली नसल्याचं, तसंच तिथे काही विकासकामं केली नसल्याचा आरोप केला होता. बॉलिवूड अभिनेत्याला खासदार म्हणून निवडून दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. 2020 मध्ये पठाणकोटच्या रेल्वे स्टेशनजवळ सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते.

‘गदर 2’ च्या मुलाखतीदरम्यान सनी देओलला संसदेतील त्याच्या गैरहजेरीबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने राजकारण आपल्यासाठी नाही याची जाणीव झाल्याची कबुली दिली. 

सनी देओलने भाजपाच्या तिकीटावर 2019 ची लोकसभा निवडणूक लढली होती. गुरुदासपूर मतदारसंघात सनी देओलने काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या सुनील जाखड यांचा 82,000 हून अधिक मतांनी पराभव केला होता.

Related posts