( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ticket Cancellations Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातासंदर्भात काँग्रेसने केलेला दावा इंडियन रेलवे कैटरिंग अॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशनने म्हणजेच IRCTC ने खोडून काढला आहे. ओडिशामध्ये कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) भीषण अपघात (Odisha Train Accident) झाल्यानंतर 275 प्रवाशांचा मृत्यू झाल्यापासून हजारो प्रवाशांनी आपली रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. IRCTC ने काँग्रेसकडून करण्यात आलेल्या दाव्यावर ट्वीटरवरुन रिप्लाय दिला आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली नाही असं IRCTC चं म्हणणं आहे.
काँग्रेसने भाजपाला केलं लक्ष्य
ओडिशामधील बालासोरमध्ये 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला. त्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अगदी परदेशातील प्रमुख नेत्यांनाही यासंदर्भात आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. या अपघातामधील जखमी प्रवाशांची संख्या 1100 हून अधिक आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर निशाणा साधला. ओडिशामधील काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला लक्ष्य केलं.
तिकीटं रद्द करण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा
मागील काही काळापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणहानी झालेली रेल्वे दुर्घटना कधीच घडली नाही. शेकडो लोकांनी या अपघातामध्ये प्राण गमावला आहेत तर एक हजाराहून अधिक प्रवासी यात जखमी झालेत. या अपघातामुळे सर्वांनाचा दु:ख झालं आहे असं भक्त चरण दास म्हणाले. इतकेचं नाही तर त्यांनी या अपघातानंतर मोठ्याप्रमाणात लोकांनी रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा केला आहे. आता ट्रेनचा प्रवास सुरक्षित वाटत नाही असं लोकांना वाटत आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेसने भक्त चरण दास यांनी केलेल्या या दाव्यांचा पत्रकारपरिषदेतील व्हिडीओ पोस्ट केला आहे.
IRCTC चं म्हणणं काय?
काँग्रेसने केलेल्या या ट्वीटला IRCTC ने रिप्लाय केला आहे. काँग्रेसचं ट्वीट कोट करुन रिट्वीट करताना पक्षाने तिकीट रद्द करण्यासंदर्भातील दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. “तपशीलवार माहितीनुसार हा दावा चुकीचा आहे. तिकीटं रद्द करण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. या उलट तिकीटं रद्द करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 1 जून रोजी ही संख्या 7.7 लाख होती जी 3 जून रोजी 7.5 लाख इतकी आहे,” असं IRTC ने म्हटलं आहे.
This is factually incorrect. Cancellations have not increased. On the contrary, cancellations have reduced from 7.7 Lakh on 01.06.23 to 7.5 Lakh on 03.06.23.
— IRCTC (@IRCTCofficial) June 6, 2023
नेमका कसा झाला अपघात?
कोरामंडल एक्सप्रेसने (Coromandel Express) लूप लाइनवरील मालगाडीला धडक दिली. त्यामुळे या गाडीचे डबे बाजूच्या मार्गिकेवर पडले. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने (Bengaluru-Howrah Superfast Express) या डब्ब्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. मागील अडीच दशकामध्ये भारतात झालेला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला आहे. येथील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी 51 तासांचा अवधी लागला.