( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uttarakhand-Himachal Pradesh: नाताळ (Christmas) आणि वर्षाचा शेवट (Year End 2023) असा बेत साधून अनेकांनाच सलग सुट्ट्या मिळतात आणि या सुट्ट्या घरात बसून व्यर्थ जायला नकोत म्हणून मग भटकंतीसाठी एखाद्या कमाल ठिकाणी जायचे बेत आखले जातात. यंदाच्या वर्षीसुद्धा अनेकांनीच या भटकंतीसाठी (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड (Uttarakhand) आणि काश्मीरसारख्या (Kashmir) थंड हवेच्या ठिकाणांना पसंती दिली आणि आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशाच्या या भागामध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अनेकांनीच या भागामध्ये मुक्कामासाठी हॉटेल, होम स्टे किंवा फारच थरारक अनुभव घ्यायची इच्छा असणाऱ्यांनी तंबूंमध्ये राहण्यालाही पसंती दिली आहे. पण, या साऱ्यामध्ये पर्यटकांना काही अडचणींचाही सामना करावा लागत आहे. शिमला (Shimla), कुल्लू- मनाली (Kullu Manali) आणि मसूरी यांसारख्या ठिकाणांवर पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीची समस्या बळावताना दिसत आहे. ज्यामुळं रस्त्यावर कैक तासांसाठी वाहनं उभीच असून कासवगतीनं अपेक्षित ठिकाणाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. पर्वतीय राज्यांमधील ही परिस्थिती पाहता प्रशासनाकडून राज्यांना आपात्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीनं आखणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तराखंडमध्ये मोठं संकट
वर्षाच्या शेवटी उत्तराखंडमध्ये एका संकटाची चाहूल लागल्यामुळं आता प्रशासकीय स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये कडाक्याची थंडी पडत असून, बहुतांश भागांमध्ये तापमान शुन्याच्याही खाली गेलं आहे. ज्यामुळं हवामान विभागाकडून बहुतांश भागांना हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटकांना सामावून घेण्याती क्षमता नाही.
चमोली, जोशीमठ (Joshimath), नैनीताल (Nainital), भीमताल या उत्तराखंडमधील भागांसह हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनाली भागावर संकटाचं सावट आहे. ज्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये पर्यटक आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी पोहोचले आहेत तिथं हवामान बिघडल्यास डोंगरकडे तुटण्याची आणि जीवघेण्या भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये जमीन खचू शकते असाही इशारा दिला जात आहे.
आकडेवारी पाहिली असता अवघ्या 25 हजारांच्या मानवी वस्तीसाठी वसवण्यात आलेल्या शिमल्याची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात असून, कैक हजार पर्यटक इथं दाखल झाले आहेत. त्यामुळं परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे हे लगेचच लक्षात येत आहे.
उत्तराखंडमध्येही चित्र वेगळं नसून, अवघ्या 20 हजार मानवी वस्तीसाठी तयार करण्यात आलेलं नैनीतालही प्रमाणाहून जास्त भार सोसतानाच हळुहळू खचत आहे. तर, जोशीमठमध्येही ही भीती आता आणखी वाढली असून, हिमाचलच्या बहुतांश भागांमध्येही भूस्खलनाचा धोका असल्यामुळं आता यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या साऱ्यामध्ये पर्यटक म्हणून इतरांच्या सतर्कतेचीही महत्त्वाची भूमिका असेल, त्यामुळं वर्षाचा शेवट करताना भान हरपू नका असंच आवाहन करण्यात येत आहे.