( प्रगत भारत । pragatbharat.com)
Anand Mahindra : सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) उपलब्धतेमुळं जग इतकं जवळ आलं आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या कैक घटना अगदी सहजपणे आपल्याला बसल्या जागी पाहता येतात. हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळं या गोष्टी फार सहजपणे हाती लागतात आणि त्यासंबंधीचे विषयही आपलं कुतूहल जागं करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर या गोष्टी शक्य झाल्या असून, त्यांचा वापर प्रत्येकजण आपल्या परिनं करत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडू पाहणाऱ्या असंख्य युजर्समध्ये जवळपास सर्वांचाच समावेश आहे. पण, त्यातली काही नावं विशेष लक्ष वेधून घेतात. यातील एक नाव म्हणजे महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांचं.
नव्या संकल्पना, क्रांतीकारी विषय या आणि अशा अनके विषयांवर महिंद्रा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्यक्त होत असतात. पण, यावेळी मात्र त्यांनी एक चिंता व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘आपण सगळे एका पिंजऱ्यामध्ये फसलो आहोत’, असं कॅप्शन लिहिलं.
महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ नव वर्षाच्या स्वागताच्या क्षणाचा असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. जगभरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात, आतषबाजी करत 2024 चं स्वागत करण्यात आलं. यातलाच एक क्षण महिंद्रा यांनी शेअर केला. NO CONTEXT HUMANS नावाच्या पेजवरील या व्हिडीओमध्ये नव्या वर्षासाठीचं काऊंटडाऊन आणि त्यानंतर होणारी आतषबाजी हे सर्वकाही पाहत, डोळ्यात साठवण्याऐवजी तिथं असणारा प्रत्येजकण हातात मोबाईल घेत हे क्षण रेकॉर्ड करण्यात मग्न झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यातील कोणालाही या क्षणाचा आनंद मोबाईल बाजूला सारून पाहावासा वाटला नाही.
We are trapped.
In a cage of screens…— anand mahindra (@anandmahindra) January 3, 2024
अतिशय चिंताजनक पिढीची झलक दाखवणारा हाच व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण एका पिंजऱ्यामध्ये फसलो आहोत, हा स्क्रीन्सचा पिंजरा आहे अशीच निराशाजनक प्रतिक्रिया महिंद्रा यांनी दिली. तुम्हालाही हे पटतंय का?