( प्रगत भारत । pragatbharat.com)
EaseMyTrip suspends all Maldives flight : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये संबंध ताणले गेले आहेत. मालदीव सरकारने या टिप्पणीवरून तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड होऊ लागल्यानंतर आता मालदीवच्या एका माजी मंत्र्याने चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांचा विरोध असाच सुरू राहिल्यास मालदीववर त्याचा मोठा परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आता याचा परिणाम देखील दिसू लागला आहे. मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील 8,000 हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. तर 2500 हून अधिक लोकांनी मालदीवला जाणाऱ्या विमानांची तिकिटे रद्द केली आहेत.
मालदीवच्या बहिष्कार मोहिमेदरम्यान इजी माय ट्रिपने एक मोठे पाऊल उचलले आहे. इजी माय ट्रिपने मालदीवच्या सर्व फ्लाइटचे बुकिंग स्थगित केले आहे. EaseMyTrip ही एक भारतीय ऑनलाइन प्रवासी कंपनी आहे. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या काही मंत्र्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा जबर फटका आता मालदीवच्या पर्यटनाला बसत आहे.
भारताच्या समर्थनार्थ उभं राहून,इजी माय ट्रिप ट्रॅव्हल कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ट्रॅव्हल्स कंपनीने आपला संताप व्यक्त केला आहे. निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशासोबत एकजुटीने उभं राहण्यासाठी इजी माय ट्रिपने मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहेत,’ असे निशांत पिट्टी यांनी म्हटलं आहे.
ऑनलाइन ट्रॅव्हल सोल्यूशन्स प्रदाता इजी माय ट्रिपने चलो लक्षद्वीप मोहीम सुरू केली आहे. इजी माय ट्रिपचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. 2008 मध्ये निशांत पिट्टी, रिकांत पिट्टी आणि प्रशांत पिट्टी यांनी इजी माय ट्रिपची स्थापना केली होती. 4 जानेवारी रोजी प्रशांत पिट्टी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लक्षद्वीपचे पाणी आणि समुद्रकिनारे मालदीवसारखेच चांगले असल्याचे म्हटलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भेट दिलेल्या या प्राचीन स्थळाचा प्रचार करण्यासाठी आम्ही इजी माय ट्रिपवर खास ऑफर घेऊन येत आहोत, असे या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती आणि त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याची खिल्ली उडवली होती. मालदीवच्या नेत्यांनी लक्षद्वीप हे भारतीयांसाठी पर्यटन स्थळ असल्याचे चित्रण करून वाद निर्माण केला.
मालदीवचे तीन मंत्री निलंबित
मालदीव सरकारने पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. मालदीवमधल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनीसुद्धा या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर युवा मंत्रालयातील मंत्री मलशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.