( प्रगत भारत । pragatbharat.com)
बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गोव्यात मुलाची हत्या केल्यानंतर कॅबमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी मुलाचा मृतदेह बॅगेत भरला होता. आपल्या पतीसह असणाऱ्या संबंधांचा दाखल देत त्यांनी हत्येचं कारण सांगितलं असता पोलीसही चक्रावले.
39 वर्षीय सूचना सेठ यांनी उत्तर गोव्यातील कंडोलिम बीचवर एक लक्झरी अपार्टमेंट बूक केलं होतं. सोमवारी सकाळी त्या दाखल झाल्या होत्या. पण त्यानंतर जे काही घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे.
सूचना सेठ कोण आहेत?
– सूचना सेठ या द माइंडफुल एआय लॅबच्या संस्थापक आहेत. त्या चार वर्षांपासून संस्थेचं नेतृत्व करत आहेत, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करते.
– – सूचना सेठ यांनी बर्कमन क्लेन सेंटरमध्ये दोन वर्षे संलग्न म्हणून काम केलं. बोस्टन, मॅसॅच्युसेट्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जबाबदार मशीन लर्निंगच्या नैतिकता आणि प्रशासनात योगदान दिलं.
– द माइंडफूल एआय लॅबची स्थापना करण्यापूर्वी, सूचना सेठ बंगळुरुमधील बूमरँग कॉमर्समध्ये वरिष्ठ डेटा वैज्ञानिक होत्या. त्या किंमत ऑप्टिमायझेशन आणि बुद्धिमत्तेसाठी डेटा-चालित उत्पादने डिझाइन करायची. त्यांनी या काळात दोन पेटंट दाखल केलं. त्या इनोव्हेशन लॅबशीही संबंधित होत्या. सूचना सेठ कंपनीच्या डेटा सायन्सेस ग्रुपमध्ये वरिष्ठ विश्लेषण सल्लागार म्हणून काम करत होत्या.
– सूचना सेठ यांनी कोलकाता विद्यापीठातून प्लाझ्मा फिजिक्ससह खगोल भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
– त्यांनी रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरमधून प्रथम क्रमांकासह संस्कृतमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आणि भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेज, कोलकाता येथून प्रथम श्रेणी सन्मानांसह भौतिकशास्त्र (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे.
सूचना सेठ यांचं 201 मध्ये लग्न झालं होतं. 2019 मध्ये त्यांना मुलगा झाला. 2020 मध्ये पती आणि पत्नीतील वाद कोर्टात पोहोचला होता. यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. कोर्टाने मुलगा दर रविवारी वडिलांना भेटू शकतो असा आदेश दिला. पण ही गोष्ट सूचना सेठ यांना आवडली नव्हती. यामुळे त्या तणावात होत्या. मुलाने पित्याला भेटू नये अशी त्यांची इच्छा होती.
मुलाला वडिलांपासून दूर कसं करावं यावरील उपाय त्या शोधत होत्या. पण त्या मुलाची हत्या करतील असा विचार कोणीही केला नव्हता. मुलाला गोवा फिरवण्याच्या नावाखाली त्या घेऊन पोहोचल्या आणि हत्या केली. मुलगा फक्त 4 वर्षांचा होता. धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह बॅगेत भरला. हॉटेलमधील रुम स्वच्छ करुन त्या निघत असताना कर्मचाऱ्यांनी तुमचा मुलगा कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. यादरम्यान सूचना यांनी टॅक्सीत बॅग टाकली आणि निघून गेल्या. शंका आल्याने कर्मचाऱ्यांनी रुम पाहिली असता तिथे रक्ताचे काही डाग होते. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलिसांनी थेट चालकाशी संपर्क साधला आणि सूचना सेठ यांनी कळू न देता टॅक्सी थेट पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितलं.
पोलिसांना सांगितलं हत्येचं कारण
पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता उत्तर ऐकून तेदेखील चक्रावले. मुलाने त्याच्या वडिलांना भेटू नये अशी आपली इच्छा होती, पण कोर्टाच्या आदेशामुळे आपण हतबल होते. यामुळेच आपण मुलाची हत्या केली. जेणेकरुन पती त्याला भेटू शकणार नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सूचना सेठ यांना अटक केली असून, यासंबंधी पत्रकार परिषद घेणार आहेत.