( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: हिंदू धर्मात साधू-संतांना विशेष महत्त्व असतं. खरे आणि तपस्वी साधू-संत आपल्या प्रवचनांमधून ज्ञान देतात. भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम साधू-संत करतात. अनेकांना या साधू-संतांचा मोठा आधार वाटतो. सध्या राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरुन बरीच चर्चा सुरु असतानाच धर्म चक्रवर्ती तुलसी पीठाधीश्वर आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी स्वामी महाराज चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडपणे पाठींबा देणारे तुलसी पीठाधीश्वर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यास खरोखरच त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे की काय असा प्रश्न पडेल.
80 ग्रंथ लिहिलेले
तुलसी पीठाधीश्वर हे त्यांच्या असाधारण गोष्टींसाठी ओळखले जातात. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केलं आहे. 2 महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून अनेक भविष्यवाण्या केल्या असून त्यापैकी बऱ्याच खऱ्या ठरल्यात. त्यांनी 22 भाषांचं ज्ञान आहे. त्यांनी 80 ग्रंथ लिहिलेले आहेत. तुलसी पीठाधीश्वर जगातील पहिलं दिव्यांग विश्वविद्यालयही चालवतात. तुलसी पिठाधिश्वर हे शिक्षक आहेत, संस्कृतचे विद्वान आहेत, लेखक, संगीतकार, गायक, नाटककार, बहुभाषापारंगत आणि 80 ग्रथांचे रचनाकार आहेत.
लिहितात आणि शिकतात कसं?
जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी महाराज केवळ 2 महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली. त्याच्या डोळ्यांना ट्रॅकोमाची लागण झाल्याचे सांगितलं जातं. जगद्गुरू श्री रामभद्राचार्य जी हे रामानंद पंथातील सध्याच्या 4 जगद्गुरु रामानंदाचार्यांपैकी एक आहेत. 1988 पासून ते या पदावर आहेत. जगद्गुरू वाचू किंवा लिहू शकत नाहीत. तुलसी पीठाधीश्वर हे ब्रेल लिपी वापरत नाहीत. ते फक्त ऐकून शिकतात. केवळ ऐकून ते गोष्टींचं पाठांतर करतात आणि त्या गोष्टी आपल्या समर्थकांना प्रवचनातून सांगतात. तसेच काही लिहायचं असेल तर केवळ बोलतात आणि शिष्यांची मदत घेऊन त्या माध्यमातून लिहून घेतात. अंध असूनही तुलसी पीठाधीश्वरांना 22 भाषांचे ज्ञान असून त्यांनी 80 ग्रंथांची रचना केली आहे. 2015 मध्ये जगद्गुरू श्री रामभद्राचार्यजींना भारत सरकारने पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते.
जन्म, गुरु अन् संस्था…
तुलसी पीठाधीश्वर यांचं खरं नाव गिरीधर मिश्रा असं असून ते रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1950 रोजी उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील संदिखुर्दमध्ये वडील पंडित राजदेव मिश्रा आणि आई शची देवी मिश्रा यांच्या पोटी झाला. तुलसी पीठाधीश्वर नावाने ओळखले जाणार स्वामी रामभद्राचार्य हे तुलसीपीठाचे संस्थापक असून ते राम कथाकार आहेत. स्वामी रामभद्राचार्य यांची आणखी एक ओळख म्हणजे अयोध्येतील रामजन्मभूमी वादात ते भगवान श्री रामाचे वकीलही होते. ते रामानंदी संप्रदायाचे संत आहेत. त्याचे 3 प्रमुख गुरु आहेत. यामध्ये पंडित ईश्वरदास महाराज (मंत्र), राम प्रसाद त्रिपाठी (संस्कृत), राम चरण दास (संप्रदाय) यांचा समावेश होतो. स्वामी रामभद्राचार्य हे जन्मतः अंध असूनही रामचरितमानस, गीता, वेद, उपनिषद, वेदांत त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांनी श्री तुळशीपीठ, चित्रकूट आणि जगतगुरू रामभद्राचार्य अपंग विद्यापीठ, चित्रकूट या दोन संस्थांची स्थापना केली आहे.
पुरस्कार
स्वामी रामभद्राचार्य यांच्याकडे धर्म चक्रवर्ती, महामहोपाध्याय, श्री चित्रकूट तुलसी पीठाधीश्वर, जगद्गुरु रामानंदाचार्य, थोर कवी, प्रस्थानत्रयी भाष्यकार अशा पदव्या आहेत. त्यांना मिळालेल्या प्रमुख पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण (2015), देवभूमी पुरस्कार (2011), साहित्य अकादमी पुरस्कार (2005), बादरायण पुरस्कार (2004), राजशेखर सन्मान (2003) यासारख्या पुरस्काराचा समावेश आहे. ते सध्या चित्रकूटमध्ये श्री तुळशीपीठ येथे वास्तव्यास आहेत.