Ayodhya Ram Mandir Inauguration : पावलांच्या सहाय्यानं मोजला भूखंड; राम मंदिराची आणखी करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांना विसरून चालणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या धर्तीवर देशभरात एकच उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान होत असून, या मंदिरामुळं भारतीय इतिहासामध्ये एक नवं पान जोडलं जाणार आहे. अशा या अयोध्येतील मंदिरातीच संकल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं महत्त्वपूर्ण काम कोणी केलं तुम्हाला माहितीये? 

साधारण 30-35 वर्षांपूर्वीच मूळच्या पालीताणा आणि सध्या अहमदाबाद इथं राहणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिर निर्माण आंदोलनादरम्यान VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून राम मंदिराची आखणी केली होती. ज्यानंतर कैक वर्षे उलटून गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयानंतर सोमपुरा यांच्या आखणीनुसारच अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं. 

राम जन्मभूमी येथे सिंघल यांच्यासमवेत गेल्यानंतर सिंघल यांनी सोमपुरा यांच्याकडे मंदिराच्या आखणीची विनंती केली. मंदिर नेमकं कसं हवं याचं वर्णन त्यांनी सोमपुरा यांच्याकडे केल्याची माहिती खुद्द चंद्रकांत सोमपुरा यांनीच माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. जिथं मंदिराचा मूळ पाया होता तिथं शासनाकडूनच मोजमाप करण्यासाठीची पट्टी वापरण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळं मग, पावलं चालत त्या पावलांच्या मापानं हा भूखंड मोजण्यात आला. 

मोजणी झाल्यानंतर राम मंदिरासाठीचे तीन प्लान समोर आले. यापैकी एका मॉडेलला सिंघल यांनी पसंती दिली. याच मॉडेलला कुंभ मेळ्यादरम्यान साधुसंतांपुढं सादर करण्यात आलं. सोमपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार आधीच्या मंदिरात गर्भगृह होतं, समोर मुख्य मंडप, नृत्य मंडप होता. त्याच धर्तीवर नवं मंदिर उभारण्यात आलं. श्रीराम मंदिरातील गर्भगृह अष्टकोनी असून ते विष्णूच्या आठ रुपांचं प्रतीक आहे. मंदिरामध्ये शिखर, मंदिर, गुड मंडप, नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप आणि प्रार्थना मंडप साकारण्यात आले आहेत.

आव्हानांचा सामना करत सर्वप्रथम राम मंदिराची संकल्पना सुचणाऱ्या आणि त्यानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी घेतलेली मेहनत पाहता राम मंदिराच्या या मंगलमय वातावरणात चंद्रकांत सोमपुरा यांना विसरुन चालणार नाही. 

Related posts