Extension of Harbor line to Borivali Malad station will be upgraded mumbai( प्रगत भारत । pragatbharat.com)

गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. विस्तार प्रकल्पामध्ये हार्बरवरील मालाड स्थानक उन्नत होणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन या स्थानकांपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकही भविष्यात उन्नत होईल.
हार्बर मार्गावर सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ उजाडले. परंतु तांत्रिक कारणास्तव प्रत्यक्षात गोरेगावपर्यंत लोकल गाड्या मार्च २०१९ पासून धावू लागल्या. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प एमयूटीपी-३ ए अंतर्गत राबविण्यात येत आहे.

या मार्गिकेच्या संरेखन योजनेवर पश्चिम रेल्वेकडून काम सुरू आहे. गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्गासाठी उपलब्ध जागेचा विचार करता तो काही पट्ट्यात उन्नत (एलिव्हेटेड) करण्यात येणार आहे. या हार्बर मार्गिकेदरम्यान मालाड, कांदिवली दोन स्थानके असून मालाड स्थानक उन्नत होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक ; हार्बरवर मेगाब्लॉक नाही

स्थानक उन्नत करताना तिकीट खिडकी आणि अन्य सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. या मार्गिकेचे जिओटेक, तसेच ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भूसंपादन आराखडा आणि वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणांकडे सादर करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आणि राज्य सरकारकडूनही निधी प्राप्त होताच या मार्गिकेच्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गिकेचे काम पूर्ण होण्यास साधारण तीन ते पाच वर्षे लागतील.

हेही वाचा : मुंबई-ठाण्यात रुद्रवर्षां ; मोसमातील सर्वाधिक पाऊस; आणखी एक दिवस जोर कायम

प्रवासी संख्या १० लाखांपर्यंत पोहोचेल

हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार होताच २०३१ पर्यंत प्रवासी संख्येत आणखी दोन लाखांची भर पडेल. तर या हार्बर मार्गावर एकूण प्रवासी संख्या १० लाखांपर्यंत पोहोचेल.कुर्ल्याहून सीएसएमटीपर्यंत पाचवी – सहावी मार्गिका आणण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण आहे. त्यामुळे चुनाभट्टी – टिळकनगर स्थानकांदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येत असून या स्थानकादरम्यान येणारे हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत होणार आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या तरीही त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे जागा उपलब्ध करण्यासाठी हार्बरवरील कुर्ला स्थानक उन्नत करण्याचे नियोजन आहे.Related posts