Kalyan Crime News : भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; उल्हासनगरमध्ये खळबळ, पोलीस ठाण्यातील घटना



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kalyan Crime News :  भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे  शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला असल्याची घटना घडली. महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे.  

मागील काही काळापासून कल्याण आणि परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय वाद सुरू आहेत. आजही, शुक्रवारी (2 फेब्रुवारी) एका वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात बैठक सुरू होती. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाले. हा वाद वाढल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

महेश गायकवाड जखमी

गोळीबाराच्या घटनेत महेश गायकवाड हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला जखम झाल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर महेश गायकवाड जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. 

जमिनीच्या वादातून गोळीबार?

मिळालेल्या माहितीनुसार, एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. आज गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी  येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. 

अधिक पाहा..

Related posts