ABP Majha Majha Katta Pralhad Pai Jeevanvidya Mission On Life And Positive Power( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: मन आपल्या स्वाधीन नाही, तर आपण मनाच्या अधीन आहोत, त्याच्यामागे फरफटत जात आहोत. त्यामुळेच आज सगळीकडे नकारात्मकता आहे. हे बदलायचं असेल तर मनावर ताबा मिळवायला हवा,  मन जर आपल्या हाती आलं तर मनाच्या सामर्थ्यानं आपण सर्वकाही मिळवू शकतो असं प्रल्हाद पै म्हणाले. जीवनविद्या मिशनचे प्रमुख आणि सदगुरू वामनराव पै यांचे सुपुत्र असलेले प्रल्हाद पै एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आले होते. 

जगभरातील लक्ष्यावधींच्या आयुष्यात बदल घडवणारे अध्यात्म गुरू अशी प्रल्हाद पै यांची ओळख आहे. वामनराव पै यांचं निधन झाल्यावर जीवनविद्या मिशनची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. 

प्रल्हाद पै म्हणाले की, “आज सगळीकडे दु:ख, नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे सकारात्मकता गरजेची आहे. पण एका दिवसात ते शक्य नाही. विचारांचं शास्त्र जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत विचारांची गंभीरता लक्षात येत नाही. सदगुरुंनी या सगळ्या मागचं विचार शास्त्र मांडलं. आम्ही तुम्हाला काही सोडायला सांगत नाही, फक्त मन धरायला सांगतो. मन आपल्या स्वाधीन नाही, आपण मनाच्या अधीन आहोत. त्यामागे फरफटत जात आहोत. मनाला आपल्या स्वाधीन करणे हे आपल्याला समजलं पाहिजे. मन जर आपल्या हाती आलं तर मनाच्या सामर्थ्यानं आपण सर्वकाही मिळवू शकतो. सर्वकाही देण्याची ताकत ही मनामध्ये आहे. अध्यात्म म्हणजे केवळ भजन नव्हे तर मनाला अधीन करणे होयं.”

मनाचं सामर्थ्य काय असतं यावर बोलताना प्रल्हाद पै म्हणाले की, “मनाचं शास्त्र म्हणजे मनाचं सामर्थ्य. हे सगळं आपल्यामध्ये आहे. आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आपल्या विचारामुळे घडल्या. आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम हे विचार करत असतात. सर्व काही निर्माण करण्याची ताकत आपल्याकडे असते. त्याचं माध्यम म्हणजे मन होय. मनामध्ये जो काही आपण विचार करु ते साकार करण्याचं सामर्थ्य असतं.”

सहकारात्मक विचार आवश्यक 

प्रल्हाद पै म्हणाले की, “चांगले विचार करण्यासाठी आम्ही शिकवतो. सकारात्मक आणि सहकारात्मक, सर्वसमावेशक विचार केला तर आयुष्यात सर्वकाही मिळेल. मी मोठा होईन हे सकारात्मक आहे, पण सर्वजण मोठे होतील हा विचार व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. त्यावेळी आपल्या मनात कोणतीही शंका कुशंका निर्माण होत नाही. विचाराला विश्वासाची जोड आवश्यक आहे. कुठलाही विचार सातत्याने करणे आवश्यक असते. त्यानंतर यश मिळू शकतं. एखादी लहान इच्छा तुम्ही सातत्याने करत राहिला तर त्यामुळे यश नक्कीच मिळतं हा अनुभव आहे. तुम्ही जर सर्वांसाठी काही केलं तर त्यामध्ये तुम्ही येताच.”

प्रार्थनेनं मन स्थिर राहतं 

प्रल्हाद पै म्हणाले की, “आताच्या काळात सगळे सुखाच्या मागे लागले आहेत. आज जगामध्ये अनेकांना सुख मिळतंय, यश मिळतंय, पण त्यांना समाधान मिळत नाही. पण आमचा मार्ग, हार्मोनियस थिंकिंग, यामुळे सर्व काही मिळेल. सुख येताना समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि शांतीही मिळणार आहे. सर्वांचा विचार केल्यानंतर समाधान मिळतंच. प्रार्थना म्हणायला लागला तर मन स्थिर होतं. स्थीर मन हे सुखाचा सागर आहे. अध्यात्मिक सुख , समाधान शांती सर्वकाही मिळतं.” 

ते पुढे म्हणाले की, “एकटा माणूस हा सुखी होऊ शकत नाही, त्यामुळे इतरांचा विचार करण्यासाठी सदगुरू शिकवतात. त्य़ाचमुळे सदगुरूंनी ‘हे इश्वरा…’ ही प्रार्थना  निर्माण केली. सुरुवातीला या प्रार्थनामध्ये रक्षण टाकलं नव्हतं. नंतर ते टाकण्यात आलं. 1980 च्या काळात यामध्ये काही बदल करण्यात आला. चार ओळींची ही प्रार्थना आहे. सगळ्यांचं भल कर असं म्हणताना कुणाचाही त्यामध्ये तिरस्कार नाही.”

प्रल्हाद पै म्हणाले की, “मी आणि माझं हे ओझं आहे, त्यामुळे मन व्यापक केलं तर अधिक समाधान मिळतं. सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला आम्ही शिकवतो. अपेक्षा कमी नका करू पण मन व्यापक करा असं आम्ही सांगतो. आपण ज्यावेळी सर्वांचं भलं कर असं म्हटल्यानंतर माणसं जोडली जातात, माणसांची मनं जोडली जातात.”

प्रल्हाद पै म्हणाले की, “क्रिया आणि कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला याच आयुष्यात मिळतात. आलेल्या परिस्थितीमधून वाट कशी काढायची हे जीवनविद्या शिकवते.वाटी आलेल्या प्रारब्धांतून मार्ग कसा काढायचा हे शिकवलं जातं. वस्तुस्थितीचा स्वीकार करणे आणि त्यातून कसं बाहेर पडायचं  हे सदगुरू शिकवतात. अंर्तमन हे देवासमान आहे, ते सातत्याने आपल्याला कौल देत असतं. पण आपण त्याचं ऐकत नाही. त्यातून आपल्याला अडचणी निर्माण होतात.”

पाच गोष्टी महत्त्वाच्या 

सध्या संवाद संपलाय, सध्याचा संवाद हा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू आहे असं सांगताना आयुष्य चांगलं जगायचं असेल तर संवाद, स्पर्श, एकमेकांना स्पेस, सन्मान आणि सहवास या पाच गोष्टी आवश्यक असल्याचं प्रल्हाद पै यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “संवाद साधनं, क्वालिटी सहवास देणं हे अत्यावश्यक आहे. तुलना केल्याने आजच्या काळात डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रकार वाढले आहेत. चिंता आणि काळजीमुळे लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. त्यामुळे वास्तवात जगणं अत्यावश्यक आहे. उद्याचं नियोजन करा पण आज जगा. जे होईल ते चांगलं, जे होतंय ते चांगलं असा विचार करा.”

Related posts