माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक, नंदुरबार : आदिवासीबहुल नंदुरबार या लोकसभा मतदार संघाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे शनिवारी सकाळी नाशिक येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सलग नऊ वेळा ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते.  गावित यांच्या पश्चात मुलगी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, मुलगा भाजपचे नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ माणिकरावांचे एकखांबी वर्चस्व राहिले. दादा म्हणून ते ओळखले जायचे. गांधी घराण्याशी त्यांचे अतिशय निकटचे संबंध होते. काँग्रेसचा देशातील प्रचाराचा नारळ देखील नंदुरबारमधून फुटायचा. १९६५ मध्ये नवापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.  १९८० मध्ये ते नवापूरचे आमदार झाले. वर्षभरात ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. १९८१ साली ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यावेळी ते ४७ वर्षांचे होते. तेव्हापासून २०१४ पर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघावर त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात माणिकराव यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. २०१४ मधील मोदी लाटेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. रविवारी सकाळी नवापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related posts