एका पॅनकार्डवर 1000 अकाउंट्स…; ‘या’ कारणांमुळं RBIची पेटीएमवर थेट कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Payments Bank: पेटीएम पेमेंटेस बँकेवर 31 जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. फास्टॅग रिचार्ज, वॉलेट, ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट इत्यादींमध्ये ठेवी स्विकारण्यास बंदी घातली आहे. RBIनुसार, पेटीएम बँकिग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकांना वापरता येणार नाही. पण आरबीआयने पेटीएमवर ही कारवाई का केली याचे कारण आता समोर आले आहे. 

पेटीएम पेमेंट बँकवर निर्बंध लादण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कोणतीही पडताळणी न करता करोडो अकाउंट तयार करण्यात आले आहेत. या अकाउंटची केवायसी प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली नव्हती. तसंच, या अकाउंटमधून करोडो रुपयांचे व्यवहारदेखील करण्यात आले होते. त्यामुळं मनी लाँड्रिगचा संशय व्यक्त करण्यात येत होता. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, आरबीआयने पेटीएमवर निर्बंध लादण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे, Paytm Payments Bank अंतर्गंत एका पॅनकार्डवरुन एक हजाराहून अधिक युजर्सने खाते उघडले होते. त्याव्यतिरिक्त RBI आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या चौकशीत पेटीएम बँकेने नियमांचे पालन न केल्याचे उघड झाले आहे. 

पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी होणार 

राजस्व सचिव संजय मल्होत्रा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, फंडमध्ये हेराफेरीचा कोणताही पुरावा आढळल्यास पेटीएम पेमेंटसची ईडीकडून चौकशी होऊ शकते. यादरम्यान पेटीएमने स्पष्ट केले आहे की, पेटीएम कंपनी आणि वन 97 कम्युनिकेशनचे सीईओ विजय शेअर शर्मा यांची मनी लाँड्रिगच्या आरोपांसाठी ईडी चौकशी करु शकत नाही. काही व्यापाऱ्यांची चौकशी होऊ शकते. बँक या प्रकरणी पूर्ण सहकार्य करेल. 

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दोन दिवसांतच पेटीएमचे शेअर्स 40 टक्के कोसळले आहेत. त्यानंतर भारतातील स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एस्कचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)ने पेटीएम शेअर्सची दैनंदिन ट्रेडिंग मर्यादा 10 टक्क्यांने घटवली आहे. 

पेटीएमवर निर्बंधांनंतर ग्राहकांचे काय होणार?

पेटीएमवर निर्बंध लादल्यानंतर ग्राहकांच्या पैशांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिलं आहे. पेटीएममध्ये खातं असलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे काढता येणार आहे. बचत, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यात पैसे असल्यास ग्राहकांना ते काढता येणार आहे. आरबीआयच्या कारवाईमुळं पेटीएम नवीन ग्राहक स्वीकारु शकत नाही. 

1 मार्चपासून नवीन ठेवी आणि टॉपअपवर बंदी आहे. ग्राहकांना मात्र पेटीएममधून आपले पैसे काढण्यावर कोणतेही बंधन नाही. वॉलेटमध्ये असलेले पैसे ते वापरु शकणार आहेत. 

Related posts