Hasan Mushrif Announced To Give A Ont Time FRP( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hasan Mushrif : राज्यातील ऊस दरासाठी निर्णायक असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला होणार आहे. या परिषदेपूर्वीच एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्यामुळे एक प्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या रेट्यामुळेच ही भूमिका घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे नियोजित ऊस परिषदेवर राजू शेट्टी ठाम असून ते काय भूमिका घेतात ते औत्सुक्याचे असेल. 

राज्यात गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी एकरकमी एफआरपी हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये मुश्रीफ यांनी आत एकरकमी घोषणा केली आहे. गेल्या हंगामात शाहूने एकरकमी एफआरपीची घोषणा करत कोंडी फोडली होती. मुश्रीफ यांनी घोषणा केली त्यावेळी अनेक कारखानदार उपस्थित होते. 

गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापुरातील सर्वच कारखानदारांनी एक रकमी एफआरपी दिली आहे. गेल्या हंगामात शंभर टक्के एफआरपी देण्यात कोल्हापूर आघाडीवर आहे. गेली दोन वर्षे कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यात एफआरपी दोन-तीन टप्प्यात दिली जाते. दुसरीकडे, राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला होत आहे. या परिषदेत शेट्टी यांनी अधिकच्या एफआरपीची मागणी केल्यास संघर्ष नाकारता येत नाही. मात्र, कोंडी फोडण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांनी केला आहे.   

राजू शेट्टींची भूमिका काय?

खतांचे तसेच मजुरीचे वाढलेले दर, साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपीची रक्कम अधिक मिळावी, अशी आमची मागणी असणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी 9 ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान घेऊन याबाबत शेतकऱ्यांना जागरूक केलं जाणार आहे. 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत 9 दिवस जागर यात्रा निघणार आहे. ही यात्रा सरूड, परिते, गडहिंग्लज, निपाणी, येडेमच्छिंद्र, कुंडल, घुणकी, कागल, दत्तवाड, चंदगड, कोडोली, वळीवडे व कांदे या ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. 

Related posts