पुणे : आयटीआय इन्स्ट्रक्टर, रेल्वेची भरती परीक्षा एकाच वेळी( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि रेल्वेची भरती परीक्षा एकाच वेळी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेले उमेदवार अडचणीत आले असून, आयटीआयची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय इन्स्ट्रक्टर पदाच्या १ हजार ४५७ जागा भरल्या जाणार आहेत. ही परीक्षा २८ आणि २९ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. तर २०१९ च्या रेल्वे भरती परीक्षेची केंद्रे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये आहेत. ही परीक्षा १९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. रेल्वेची भरती चार वर्षांनी होत आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त गट ब परीक्षा ८ ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा : पुणे : शिंदे गटाला दसरा मेळावा घ्यायचा असल्यास त्यांनी दुसर्‍या मैदानांवर घ्यावा : जयंत पाटील

अनेक उमेदवारांनी आयटीआय इन्स्ट्रक्टर, रेल्वे आणि संयुक्त गट ब परीक्षेचा अर्ज भरला आहे. रेल्वे आणि संयुक्त गट ब परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर झालेल्या असताना व्यवसाय आणि प्रशिक्षण संचालनालयाने त्या तारखा विचारात न घेता आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षेची तारीख जाहीर करून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे संबंधित उमेदवारांची गैरसोय होत आहे. आता उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षेची तारीख बदलून ती ८ ऑक्टोबरनंतर आयोजित करावी. जेणेकरून सर्व उमेदवारांना परीक्षेची संधी मिळेल. या बाबतची मागणी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

Related posts