प्रोजेक्ट चित्ता काँग्रेसचाच; जयराम रमेश यांनी मोदी सरकारला घेरले – congress leader jairam ramesh shared a letter on twitter claiming that project chitta was launched in 2009( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी ट्विटरवर एक पत्र शेअर करून त्यांनी सन २००९मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू केल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी पूर्वीच्या सरकारांनी विधायक प्रयत्न केले नसल्याच्या आरोपांवर ते ‘विकृत खोटारडे’ असल्याचे म्हटले.

‘सात दशकांपूर्वी देशातून चित्ते नामशेष झाल्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठी कोणतेही रचनात्मक प्रयत्न केले गेले नाहीत,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मागील सरकारांना लक्ष्य केले होते. नामिबियातून आणलेल्या आठपैकी तीन चित्त्यांना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष बंदोबस्तात सोडण्यात आल्यानंतर मोदींनी हे वक्तव्य केले होते.

‘सन २००९मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू झाल्याचे दाखविणारे हे पत्र आहे. आपले पंतप्रधान विकृत खोटे बोलणारे आहेत. मी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये व्यग्र असल्याने मला काल हे पत्र देता आले नाही,” असे रमेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटसोबत त्यांनी तत्कालीन पर्यावरण आणि वनमंत्री म्हणून सन २००९मध्ये ‘वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया’चे एम. के. रणजितसिंग यांना लिहिलेले पत्रही शेअर केले.

या पत्रात रमेश यांनी रणजितसिंग यांना चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करण्यास आणि पुनर्वसनासाठी विविध संभाव्य ठिकाणांचे तपशीलवार विश्लेषण करण्यास सांगितले होते. रमेश यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) लगेच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

चित्त्यांना सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा

श्योपूर (मध्य प्रदेश) : देशात नव्याने आणण्यात आलेल्या आफ्रिकन चित्त्यांसाठी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात २० ते २५ चित्ते ठेवण्यासाठी पुरेशी जागा असून, त्यांच्या खाद्यासाठी मुबलक शिकार उपलब्ध आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जे. एस. चौहान हे चित्ता पुनरुज्जीवित करण्याच्या प्रकल्पाशी संबंधित आहेत. ही योजना खूप यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ‘कुनो राष्ट्रीय उद्यान हे ७५० चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे आणि २० ते २५ चित्ते ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. शिवाय, हरीण, चितळ, रानडुक्कर, नीलगाय आणि चिंकारा यांसह त्यांच्या अन्नासाठी भरपूर शिकार उपलब्ध आहे,’ असे चौहान यांनी सांगितले.

ग्रामस्थांना भूसंपादनाची भीती

श्योपूर : मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांच्या स्वागताचा एकीकडे जल्लोष सुरू आहे. दुसरीकडे येथील ग्रामस्थांना मात्र त्यांची जमीन हिसकावून घेतली जाण्याची भीती आणि चित्त्यांकडून त्यांच्यावर हल्ले होण्याची चिंता सतावत आहे. त्याचवेळी चित्त्यांच्या आगमनामुळे उद्यान प्रसिद्ध झाल्यानंतर तेथे पर्यटकांची संख्या वाढल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी आशाही काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.

Related posts